‘आरटीओ’त स्मार्ट कार्डचा खडखडाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरटीओ’त स्मार्ट कार्डचा खडखडाट
‘आरटीओ’त स्मार्ट कार्डचा खडखडाट

‘आरटीओ’त स्मार्ट कार्डचा खडखडाट

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः पुण्यासह राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठीचा (आरसी) स्मार्ट कार्ड पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पुण्यातील सुमारे वीस हजार वाहनचालकांना वाहन परवानासाठी व तीन हजार वाहनचालकांना ‘आरसी’साठी प्रतीक्षा करावी लागत आहे. स्मार्ट कार्डचा पुरवणाऱ्या ‘रोझमार्टा’ या कंपनीचे परिवहन विभागाशी स्मार्ट कार्डच्या पुरवठ्यासाठी करार झाला. मात्र, सातत्याने या कंपनीकडून पुरवठा विस्कळित होतो. त्याचा फटका सामान्य वाहनचालकांना बसतो.

गेल्या दोन महिन्यापासून पुणे आरटीओ कार्यालयाला स्मार्ट कार्डचा पुरवठ्याविषयी सातत्याने अडचणी जाणवत आहे. पुरवठ्याअभावी महिन्याला दहा ते पंधरा हजार कार्डचा अनुशेष राहतो. दर महिन्याला ही संख्या वाढत जात आहे. आता किमान वाहन परवानासाठी २० हजार तर आरसीसाठी तीन हजार स्मार्ट कार्डची गरज आहे, अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्य उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई, परिवहन आयुक्त यांना स्मार्ट कार्डचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता एक लाख पत्रे पाठविण्यात येणार आहे.

दृष्टिक्षेपात
- प्रतिमहा ३० ते ३५ हजार कार्डची गरज
- केवळ १५ ते २० हजार कार्डचा पुरवठा
- दरमहा १५ ते २० हजार कार्डचा तुटवडा

वाहन परवानासाठी चाचणी झाल्यावर आठ दिवसांत वाहन परवाना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक वाहन चालकांना दोन-तीन महिने वाहन परवाना मिळत नाही. त्यांना आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवून ८ दिवसांत स्मार्ट कार्डचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत आहोत.
- विठ्ठल मेहता, उपाध्यक्ष, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, पुणे

स्मार्ट कार्डचा तुटवडा आहे. तो सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. संबंधित कंपनीला स्मार्ट कार्डचा पुरवठ्याविषयी सांगितले आहे.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे