
प्रवेश प्रक्रियेसाठी तयारीला लागा
पुणे, ता. २४ ः विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच आवश्यक तयारीला लागणे गरजेचे आहे. कारण, जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्य सामाईक पात्रता परीक्षांचे निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. तर याच काळात प्रवेश प्रकिया सुरू होतील, अशा वेळी गुणवत्ता यादीपासून ते कागदपत्रांपर्यंत सर्व बाबतीत ‘अलर्ट’ असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी (ता. २५) घोषित होणार असून, त्यानंतर सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना गती मिळणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल घोषित केले आहे. तर एमएचटी सीईटीचा निकाल १२ जून रोजी घोषित होण्याची शक्यता आहे. तसेच, काही खासगी महाविद्यालयांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही वेग घेणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अपुऱ्या तयारीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागल्याच्या घटनाही या आधी घडल्या आहेत.
अशी करा तयारी..
- मिळालेले गुण, आपले कौशल्य आणि प्राथमिकता लक्षात घेऊन प्रवेशाची तयारी करा
- प्रवेशासाठी कागदपत्रे जसे की, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रेमिलीयर, डोमिसाईल, जातीचा दाखल्याची पुर्तता करावी
- काही कागदपत्रांना पुन्हा अद्ययावत करण्याची गरज असते. ते वेळेत करावे
- सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी ‘इ-मेल’ वर असावी
- सीईटी सेल बरोबरच प्रवेशसाठीचे संकेतस्थळ दररोज तपासा
- आपल्याला प्रवेश ज्या महाविद्यालयात घ्यायचा असेल, तेथील प्रक्रियेची आणि शुल्काची पूर्ण माहिती घ्या
- आपण दिलेली कागदपत्रे अपलोड झाली की नाही हे तपासा
प्रवेश परीक्षांच्या निकालाच्या तारखा
- एमएचटी सीईटी - १२ जून
- पॅरा सीईटी - २ जून
प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी स्वतःची प्राथमिकता निश्चित करायला हवी. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही घ्यावे. फॅसिलेशन सेंटरवर जाताना मूळ कागदपत्रांबरोबरच त्यांची फोटो कॉपीही जवळ ठेवाली. बारावी किंवा तत्सम इयत्तेचे प्रत्यक्ष गुणपत्रक, सीईटीच्या निकालाचे गुणपत्रक जवळ असायलाच हवे. वेळोवेळी आपली जनरल मेरिट लिस्ट आणि कॅटॅगिरीमधील मेरीट लिस्ट पडताळून पाहावी.
- डॉ. गोविंद कुलकर्णी, संचालक, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग