
‘एकाच हस्ताक्षर’चा पोलिस तपास सुरू
पुणे, ता. २५ : बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षराचा तो भाग सोडून उर्वरित गुणांच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोसावी यांनी औरंगाबाद विभागात घडलेल्या गैरव्यवहार प्रकरणाची माहिती दिली. उत्तरपत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर असलेला (ओव्हररायटिंग केलेला) उत्तराचा भाग वगळून संबंधित विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उर्वरित उत्तरपत्रिकेची तपासणी केली आहे. त्या गुणांच्या आधारे त्यांचा निकाल जाहीर केला आहे. तसेच औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोसावी म्हणाले, ‘‘औरंगाबाद विभागातील २३ वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याची बाब समोर आली होती. या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. त्यात विद्यार्थी सहभागी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.’’
बारावीच्या परीक्षेदरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील एका केंद्रावर पेपर फुटल्याचा प्रकार घडला. त्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याची माहितीही राज्य मंडळाने दिली आहे.
गैरप्रकारांची विभागनिहाय आकडेवारी
विभागीय मंडळ : तोतयेगिरी : कॉपी : इतर : एकूण
पुणे : ०१ : ८८ : ३६ : १२५
नागपूर : ०० : ५२ : ०७ : ५९
औरंगाबाद : ०० : १११ : ५१० : ६२१
मुंबई : ०० : १९ : २४ : ४३
कोल्हापूर: ०० : ०३ : १७ : २०
अमरावती : ०० : २० : ४२ : ६२
नाशिक : ०० : १३ : ५९ : ७२
लातूर : ०० : ३८ : २० : ५८
कोकण : ०० : ०१ : ०० : ०१
एकूण : ०१ : ३४५ : ७१५ : १,०६१
राखीव निकाल संख्या
पुणे (२३), नागपूर (५६), औरंगाबाद (१०८), मुंबई (२), अमरावती (२६), लातूर (१७)
निकाल रद्द, प्रतिबंधित
पुणे (१), नागपूर (१), औरंगाबाद (२), मुंबई (१४), नाशिक (४), लातूर (१)