
अवतीभवती
सोमवंशी समाज सामुदायिक व्रतबंध सोहळा उत्साहात
पुणे, ता. २५ : अखिल ब्राह्मण संघातर्फे २१ बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा नुकताच झाला. या वेळी सोळा संस्कार आणि सूर्योपासना यांचे महत्त्व पंडित वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले. या प्रसंगी ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. मिहीर कुलकर्णी उपस्थित होते. या सोहळ्याला आमदार रवींद्र धंगेकर, डॉ गोविंद सिंह, संजय सुपेकर, सचिन बोधनी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, रणजित नातू, विनय कुलकर्णी, वंदना धर्माधिकारी, प्रिया शेडंगे यांनी भेट दिली.
-----------------------------------
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मिरवणूक
पुणे, ता. २५ ः महाराणा प्रताप यांच्या ४८३ व्या जयंतीनिमित्त राजपूत समाज संघ आणि महाराणा प्रताप युवक मंडळ यांच्यातर्फे नुकतीच मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर, समाज संघ अध्यक्ष सोमनाथ परदेशी, युवक अध्यक्ष रवींद्र परदेशी, जितेंद्र परदेशी, कृष्णा परदेशी, योगेश परदेशी आदी उपस्थित होते. वेगवेगळ्या क्षेत्रामधील नागरिक स्त्री - पुरुष मोठ्या संख्येने सांस्कृतिक वेषात उपस्थित होते. मिरवणुकीत महाराणा प्रताप यांचा रथ, ध्वजपथक, ढोल ताशा आणि बँड पथक यांचा समावेश होता. या प्रसंगी रक्तदान शिबिरही झाले.
-----------------
पर्यावरणविषयी छायाचित्रण स्पर्धा
पुणे, ता. २५ : इकोफोक्स व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे पर्यावरण जनजागृतीपर फोटोथॉन २०२३ छायाचित्रण स्पर्धाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सुमारे ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. मोबाईलवरून काढण्यात येणारी छायाचित्रे स्पर्धेस पात्र ठरतील. पर्यावरणाचे जतन करीत त्याचे महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी फोटोथॉन २०२३ ही छायाचित्रण स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत अवघ्या २४ तासात लाइव्ह छायाचित्र काढावयाचे आहे. शनिवारी (ता. ३ जून) सकाळी १०.३० वाजता नवी पेठेतील म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक परेश पिंपळे यांनी सांगितली.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. ही स्पर्धा पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांतही होणार आहे. स्पर्धेचा अधिक तपशील www.ecofolks.com या संकेतस्थळावर आहे.