कोथरूडमधील ग्राहक पेठ प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे, ता. १ : रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या सहकार्याने उद्योजक महिलांसाठी आयोजित केलेल्या भव्य ग्राहक पेठ प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. १) उद्घाटन झाले. कोथरूडमधील स्वामी कृपा हॉल येथे हे प्रदर्शन आयोजित केले असून रविवारपर्यंत (ता. ३) सकाळी १० ते रात्री ९ दरम्यान ते खुले आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे अध्यक्ष सुधीर बापट यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात मुंबई, धुळे, संभाजीनगर, रत्नागिरी, कोल्हापूर, कोपरगाव, संगमनेरहून आलेल्या उद्योजक महिलांचे स्टॉल्स आहेत. तसेच स्थानिक महिलांनीही प्रदर्शनात विविध उत्पादने मांडली आहेत. त्यात गणपती सजावटीच्या वस्तू, पापड, लोणची, सरबते, ज्वेलरी, ड्रेस व ड्रेस मटेरिअल, डेकोरेटिव्ह वस्तू, सौंदर्य प्रसाधने, गाऊन, साड्या,
कुर्तीज, अगरबत्ती, रांगोळी, पर्सेस, बॅग्ज, टी शर्ट, साबण, लाइटिंग, हर्बल प्रॉडक्ट, लखनवी, खेळणी, हॅंडीक्राफ्ट आदींचा समावेश आहे, अशी माहिती प्रदर्शनाच्या संयोजिका व ‘आम्ही उद्योगिनी’ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी दिली.