
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तिन्ही दलांचे बँडवादन
पुणे, ता. १५ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापाठोपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्ही संस्थांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी विद्यापीठात ‘ट्राय-सर्व्हिस बँड डिस्प्ले’ (तिन्ही दलांचे वादन) हा कार्यक्रम झाला. या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
विद्यापीठ, एनडीए आणि कर्वे समाज संस्थेच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रतिबिंब असलेल्या ‘ट्राय-सर्व्हिस बँड डिस्प्ले कार्यक्रमातून युवकांमध्ये लष्करी सेवेविषयी आकर्षण निर्माण होईल. तसेच त्यांच्या मनात देशसेवेची ज्योत निर्माण होईल.’’ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी उपस्थितांना ‘माझी माती-माझा देश’ या अभियानांतर्गत पंचप्रणची शपथ दिली. ‘एनडीए’तून विजय कालाजी यांनी, कर्वे समाज संस्थेतून मधुकर पाठक यांनी आणि विद्यापीठातून मातीचा कलश डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी कुलगुरूंकडे सुपूर्त केला. डॉ. महेश ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ः T68002