
कैद्यांच्या समुपदेशनासाठी ‘साथी’ शिबिर
पुणे, ता. १८ : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी आणि खटला सुरू असलेल्या आरोपींचे समुपदेशन करण्यासाठी कारागृहात ४० कैद्यांना सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात आले. ‘साथी’ या समुपदेशन शिबिरात ५० तासांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
कैद्यांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती वाढल्याच्या पार्श्वभूमिवर ‘पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’, ‘किंगिंग यूथ फाउंडेशन आणि ‘ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या वतीने शिबिर घेण्यात आले. या मध्ये प्रशिक्षण घेतलेले कैदी इतरांना समुपदेशन आणि मार्गदर्शन करणार आहेत.
‘‘कारागृहात काही डॉक्टर, अभियंते, वकील आणि विविध विषयांतील पदवीधर शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यातील चांगले संभाषण कौशल्य असलेल्या ४० आरोपी आणि कैद्यांना मानसिक आरोग्याविषयक समुपदेशन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षकांद्वारे मूल्यमापन केले जाईल. त्यानंतर ते इतर कैद्यांचे समुपदेशन करतील,’’ असे ग्लोबल केअर फाउंडेशनचे संस्थापक अबिद अहमद कुंडलम यांनी सांगितले.
कैद्यांना नकारात्मक मानसिकतेतून बाहेर काढण्याची गरज आहे. त्यांना जगण्याची नवी दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यांच्या मानसिकतेत सुधारणा होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घेतली आहे.
सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण