
अकरावी प्रवेशाची शेवटच्या आठवड्यात संधी
पुणे, ता. १९ : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश मिळू न शकलेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेशाची संधी मिळणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३२७ कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख १७ हजार ३० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. आतापर्यंत तीन नियमित तर पाच विशेष फेऱ्या झाल्या आहेत. दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यात प्रवेश देण्यात आला. अजूनही कॅप आणि कोट्यांतर्गत ४० हजार २३५ जागा रिक्त आहेत.
भाग एक, दोन भरण्याची सुविधा
राज्यात गणेशोत्सवामुळे काही क्षेत्रांमध्ये शाळांना सुट्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रियेची कोणतीही फेरी आयोजित केली नाही. परंतु या कालावधीत अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर अर्ज भाग एक आणि दोन भरण्याची सुविधा सुरू राहणार आहे. एटीकेटी लागू असणारे विद्यार्थीही अर्ज भरू शकतात, त्यांनी ६०० पैकी एकूण प्राप्त झालेले गुण नोंदवावेत, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
अकरावी प्रवेशाची आकडेवारी
(पुणे आणि पिंपरी-चिंचवड)
एक लाख दोन हजार ४०८
- एकूण नोंदणी
एक लाख १७ हजार ३०
- एकूण जागा
७६ हजार ७९५
- प्रवेश घेतलेले विद्यार्थी
४० हजार २३५
- रिक्त जागा
३२७
- कनिष्ठ महाविद्यालये
‘कॅप’ अंतर्गत प्रवेश
एक लाख एक हजार २७
- प्रवेशाच्या जागा
६८ हजार १२१
- प्रवेश घेतलेले विद्यार्थी
३२ हजार ९०६
- रिक्त जागा
कोट्यांतर्गत प्रवेश
१६ हजार तीन
- प्रवेशाच्या जागा
आठ हजार ६७४
- प्रवेश घेतलेले विद्यार्थी
सात हजार ३२९
- रिक्त जागा