मुस्लिम बांधव देत 
असतात ईश्वरीय कर!

मुस्लिम बांधव देत असतात ईश्वरीय कर!

इस्लामचे चौथे मुख्य तत्त्व म्हणजे ‘जकात’, अर्थात दानधर्म होय. ज्यांच्याजवळ संपत्ती आहे त्या लोकांनी दानधर्म केलाच पाहिजे अशी पवित्र कुराणची स्पष्ट आज्ञा आहे. आपली संपत्ती केवळ आपल्या स्वतःला उपभोगण्याकरिताच आहे असे कोणाही श्रीमंत माणसाने समजता कामा नये. आपल्या मिळकतीत अनाथ मुले व विधवा, अपंग व गरजू यांचाही थोडाफार हिस्सा आहे याची सतत जाणीव राहावी याकरिता हे महत्त्वाचे तत्त्व इस्लाम धर्मात गोवण्यात आले असावे. उदा. ज्या व्यक्तीजवळ ९० ग्रॅम सोने व ६३० ग्रॅम चांदी अथवा तेवढ्याच मूल्याची रोख रक्कम किंवा तेवढ्याच किमतीचा व्यापारी माल आहे, अशा सर्व मिळकतदारांनी आपल्या मिळकतीतील उत्पन्नाचा चाळिसावा भाग म्हणजे अडीच टक्के’ रक्कम जकात (इन्कम टॅक्स) म्हणून गोरगरिबांना वाटप करणे पवित्र कुराणच्या आज्ञेप्रमाणे बंधनकारक आहे. उदा. ज्याच्याजवळ हजार रुपये असतील त्याने वरीलप्रमाणे पंचवीस रुपये दानधर्मासाठी खर्च करणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी रमजान महिन्यात आपल्या देशात सुमारे २००० कोटी रुपये ‘जकात’च्या रूपाने जमा होतात.
हजरत पैगंबर असे म्हणतात की, अडचणीत सापडलेले, संकटांनी ग्रस्त असलेले, बंदिवासात असणारे, कर्जबाजारी असलेले असे जे लोक असतील त्यांना मदत करणेही प्रत्येकाचे कर्तव्यकर्म आहे आणि ही मदत म्हणजे एकप्रकारचा दानधर्मच होय हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ज्याच्या जवळ द्यावयास काहीच नाही त्यांनी सत्कृत्य करावे कारण प्रत्येक सत्कृत्य म्हणजे दान धर्मच होय. १४०० वर्षांपूर्वी इस्लाम धर्मात प्रत्येक श्रीमंत माणसाने गरिबांसाठी जकातच्या रूपाने काही रक्कम दिली पाहिजे हे सूत्रच मुळी गरिबांच्या बद्दलची असणारी करुणा, बंधुभाव आणि मानवता याची साक्ष देत नाही का? आज जेव्हा मुस्लिम धर्मीय नियमाप्रमाणे सरकारी टॅक्स देऊन देखील ईश्वरीय आज्ञा म्हणून गरीब लोकांसाठी जकात देताना दिसतो तेव्हा ईश्‍वर हा किती दयाघन आहे याची प्रचिती येते.

(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरू आहेत)

इफ्तार : ६.५६ मंगळवारी सायंकाळी
सहेरी : ५.१२ बुधवार सकाळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com