लोकसहभागाविना झालेला अर्थहिन संकल्प

लोकसहभागाविना झालेला अर्थहिन संकल्प

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २८ : बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत.. सायकल ते मेट्रो.. घनकचरा ते आरोग्य.. पर्यावरण, शिक्षण, पाणी, सांडपाणी अशा पायाभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी महापालिकेचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो. शहराचा भौगोलिक विस्तार वाढत आहे त्या प्रमाणात गरजाही बदलत आहेत. त्यांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात उमटणे आवश्यक आहे. तसेच नगरनियोजनासाठी आवश्यक असलेल्या विकास आराखड्याची (डीपी) अंमलबजावणी ठराविक कालावधीत पूर्ण होण्यासाठीची ठोस पावले अर्थसंकल्पात हवी होती. महापालिकेचे काही प्रकल्प, योजना आश्वासक वाटत असले तरी, त्यांची वाटचाल वेगाने व्हायला हवी, अशी भूमिका विविध क्षेत्रांतील तज्ञ अभ्यासक पुणेकरांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर मंगळवारी मांडली. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी महापालिकेने नागरिकांना विश्वासात घ्यायला हवे होते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शहरातील सर्वच पायाभूत सुविधांचे नियोजन विकास आराखड्यात केले जाते. त्याच्या अंमलबजावणीचे प्रभावी माध्यम म्हणजे अर्थसंकल्प. यात लोकसहभाग जास्तीत जास्त असावा, असा प्रयत्न महापालिकेने केला असता तर, नागरिकांना दिलासा मिळाला असता, असा सूरही यावेळी व्यक्त झाला. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी गेल्या शुक्रवारी (ता.२४) महापालिकेचा ९ हजार ५१५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. प्रथमच लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागाशिवाय हा अर्थसंकल्प सादर करून तो मान्यही करण्यात आला. त्यामुळे ‘सकाळ’ने पुढाकर घेत या अर्थसंकल्पावरील लोकभावना जाणून घेण्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांची बैठक आयोजित केली होती. सुमारे दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेत बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिक, पर्यावरण, वाहतूक, आरोग्य, घनकचरा, पाणी, शिक्षण, मनोरंजन, पथारी व्यावसायिक आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यातील वेळेवर मिळकत कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस, आरोग्यासाठी ‘हेल्‍दी पुणे’, पथारीवाल्यांसाठी ‘हॉकर्स पार्क’, ई- वाहनांसाठी शहरांत चार्जिंग स्टेशनचे जाळे, कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती आदी चांगल्या गोष्टींचे कौतुक करताना, काही त्रुटींकडेही सहभागी अभ्यासकांनी लक्ष वेधले आणि त्यांची पूर्तता महापालिकेने लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी, उद्योग, शिक्षण, सांडपाणी यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची तुलना करता केवळ पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात काही क्षेत्रासाठी करताना दहा टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव तरतूद केली असल्याचे दिसत असले, तरी ही तरतूद देखभाल दुरुस्ती आणि वाढलेल्या खर्चासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात नवीन कोणतीही संकल्पना अथवा पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार नसल्याचे यावरून दिसून येते. आरोग्यासाठी महापालिकेने ११० कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी, संसर्गजन्य आजारांसाठी भरीव तरतूद अपेक्षित होती, असाही सूर या वेळी व्यक्त झाला. महापालिकेने मोठे प्रकल्प, रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, उड्डाण पूल, वाहतूक नियंत्रक दिवे, वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासाठी भरीव तरतूद केली आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येमुळे नजीकच्या काळात ही तरतूद अपुरी पडू शकते, अशी चिंताही काही अभ्यासकांनी व्यक्त केली.

चौकट
अर्थसंकल्प अजूनही संकेतस्थळावर नाहीच
मेट्रो, पीएमपी, उड्डाण पूल आदींसाठी तरतूद करताना भविष्याचा वेध घेण्याची गरज होती. रुंद पदपथ, सायकल मार्ग आवश्यक असून त्यासाठी ठोस आराखडा हवा होता. पर्यावरणाचा समतोल राखत शहरातील विकास कामांचे नियोजन झाल्यास शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल. मात्र, पुणे शहर हे स्मार्ट सिटी आहे, असे म्हणत असताना अर्थसंकल्प सादर करून चार दिवस झाले तरी, अद्यापही महापालिकेच्या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरीकांना पुढील आथिॅक वर्षात शहरात काय पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत, कोणते प्रकल्प नव्याने हाती घेतले जाणार आहेत, आरोग्यासाठी नव्याने काय सुविधा निर्माण होणार आहे, सार्वजनिक वाहतूक सक्षम होणार आहे की नाही, शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नाल्यांना पावसाळ्यात पूर येणार नाही, याबाबत काय काळजी घेतली गेली आहे, वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे का, यांची माहिती मिळण्यासाठी कोणतीही साधन नाही. पारदर्शकतेचा पूर्ण अभाव या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने दिसून आला. पूर्णतः हे कारकुनी बजेट असल्याची टिकाही यावेळी काही तज्ञांनी व्यक्त केली.
-----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com