
टेट परीक्षेतील गुणांची चौकशी करण्याची मागणी
पुणे, ता. २८ : टीईटी गैरव्यवहार प्रकरणात प्रतिबंधित केलेल्या काही उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (टेट) दिली आहे. या उमेदवारांची नावे निकालातही दिसत आहेत. या परीक्षेच्या निकालाबाबतही शंका निर्माण होत आहेत. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांच्या संघटनांकडून होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयबीपीएसच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी दोन लाख ३९ हजार ७२६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख १६ हजार ४८३ उमेदवारांचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा ऑनलाइन झाल्यामुळे दोन दिवसांत निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु २१ दिवसांनंतर म्हणजेच २४ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षा परिषदेने निकाल उमेदवारांच्या लॉग-इन आयडीला पीडीएफ स्वरूपात उत्तरपत्रिका उपलब्ध करून देणे आवश्यक होते, मात्र ते देण्यात आले नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर म्हणाले, ‘‘टीईटी परीक्षेत प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी ही परीक्षा दिली असून त्यांची निकालात नावे असल्याचे दिसून येते. त्यामुळे टीईटी गैरप्रकारातील प्रतिबंधित उमेदवारांना टेट परीक्षेच्या निकालातून वगळण्यात यावे. तसेच या परीक्षेत देवघेव झाल्याचाही संशय आहे. त्याची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने चौकशी करावी.’’ याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची भूमिका जाणून घेण्यासाठी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.