
कोरोना : राज्यात शहरी भागात प्रमाण जास्त पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
पुणे, ता. २७ : राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. राज्यामध्ये सद्यःस्थितीत दोन हजार २१२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये (६६३) आहेत. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे ६०४ रुग्ण आढळले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे मंगळवारी देण्यात आली.
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. वेगवेगळ्या भागांत साडेचारशे रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान गेल्या चोवीस तासांमध्ये झाले. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा दोन हजार २१२ पर्यंत वाढला. यापैकी ७७ टक्के (एक हजार ७१७) रुग्ण मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन महानगरांमध्ये आहेत. त्यामुळे शहरी भागात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे अधोरेखित होते. परभणी, हिंगोली, वाशिम, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो. कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी ९८.१५ टक्के रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. दिवसभरात ३१६ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ७९ लाख ९१ हजार ७२८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
तीन रुग्णांचा मृत्यू
कोरोना झालेल्या तीन रुग्णांचा मृत्यू राज्यात झाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले. राज्यात आतापर्यंत ८१ लाख ४२ हजार ५०९ रुग्णांना कोरोना झाला असून, त्यापैकी एक लाख ४८ हजार ४३८ (१.८२ टक्के) रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील सर्वाधिक मृत्यू पुणे महापालिकेत (नऊ हजार ७५३) झाले असून, पुणे जिल्ह्यात सात हजार २२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये ही संख्या तीन हजार ६३३ असल्याचेही खात्याने स्पष्ट केले.
एक्सबीबी १.१६ व्हेरिएंटचे पुण्यात १५१ रुग्ण
राज्यात आतापर्यंत एक्सबीबी १.१६ या कोरोनाच्या व्हेरिएंटचे २३० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १५१ रुग्ण पुण्यातील आहेत. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर येथील २४ रुग्ण असून, ठाणे जिल्ह्यातील २३ रुग्णांचा यात समावेश आहे. कोल्हापूर, नगर (११), अमरावती (८) मुंबई आणि रायगड (१) येथेही या व्हेरिएंटच्या रुग्णांचे निदान झाले असल्याचे सांगण्यात आले. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, उर्वरित सर्व रुग्ण बरे झाले आहेत. या आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य आहेत. मात्र, ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, तेथील सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य खात्याने दिल्या आहेत.
कोरोना रुग्णसंख्या दृष्टिक्षेपात
शहर ...... सक्रिय रुग्णसंख्या
मुंबई ........६६४
पुणे ..........६०४
ठाणे .........४४९