पुणेकरांची उन्हाळ्यातील गरज होणार पूर्ण
धरणांतील पाणीसाठा : १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका साठा उपलब्ध

पुणेकरांची उन्हाळ्यातील गरज होणार पूर्ण धरणांतील पाणीसाठा : १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका साठा उपलब्ध

पुणे, ता. २९ : उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे, त्यामुळे पाण्याची गरजही वाढू लागली आहे. पुणेकरांची ऐन उन्हाळ्यातही पाण्याची गरज पूर्ण करू शकेल आणि १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध आहे. यंदा पुणेकरांसाठी पाण्याची खुशखबर असली तरीही नेहमीप्रमाणे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी मात्र पार पाडावी लागणार आहे.

खडकवासला, पानशेत व वरसगाव या धरणसाखळीतून पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शहराला साडेसतरा टीएमसी इतक्‍या पाण्याची दरवर्षी गरज भासते. मागीलवर्षी पाऊस चांगला झाल्याने बहुतांश धरणे भरली होती. त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. मार्च महिन्यानंतर हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज वाढते. त्यादृष्टीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल, पाणीटंचाई भासणार नाही, या दृष्टीने पाण्याचे वर्षभरासाठीचे नियोजन केले जाते.

खडकसवासला धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणे ३१ ऑक्‍टोबरपर्यंत १०० टक्के भरलेली होती. त्यापैकी पुणे शहराला दरवर्षी सुमारे साडेसतरा टीएमसी इतक्‍या पाण्याची गरज भासते. भामा-आसखेड व पवना धरणामधूनही काही प्रमाणात शहराला पाणीपुरवठा होतो. खडकवासला धरणसाखळीतील उपलब्धतेनुसार पाण्याचे नियोजन केले जाते. मागीलवर्षीही धरणामध्ये उपलब्ध होते, तेवढेच पाणी यावर्षीदेखील उपलब्ध आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासणार नसल्याने पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. मात्र नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्यावर नागरिकांना भर द्यावा लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.

शहराला १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतके पाणी धरणामध्ये आहे. तरीही नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून वापर करावा. पाण्याचा अपव्यय होणार नाही, पाण्याची बचत होईल यादृष्टीने काळजी घ्यावी.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

पुणे शहराला पिण्यासाठीचा पाणीसाठा मुबलक आहे. १५ ऑगस्टनंतरचा साठा राखीव ठेवून त्या वेळेच्या पावसाच्या परिस्थितीनुसार सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे ठरविले जाते.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

सध्याचा उपयुक्त पाणीसाठा
पानशेत - ५.१४ टीएमसी
वरसगाव - ८.०८ टीएमसी
खडकवासला - १.०४ टीएमसी
टेमघर - ०.३७

खडकवासला धरणसाखळी पाणीसाठा क्षमता - २९.१५ टीएमसी
३१ ऑक्‍टोबर २०२२ पर्यंतचा धरणसाखळीतील पाणीसाठा - २८.७८ टीएमसी
धरणसाखळीतील पाणीसाठ्याची टक्केवारी - ९८.७३ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com