टोलवाढ अनावश्यक असल्याची भावना

टोलवाढ अनावश्यक असल्याची भावना

पुणे, ता. २८ : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जुन्या मुंबई-पुणे महामार्गासह, मुंबई-बंगळूर महामार्गावरील टोलनाक्यावर नागरिकांना १८ टक्के जास्त टोल द्यावा लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. ही दरवाढ अनावश्यक आणि नागरिकांच्या खिशावर डल्ला मारणारी आहे, असा रोष दरवाढीबाबत नागरी संघटना, प्रवासी व माल वाहतूकदार संघटनेने व्यक्त केला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सप्टेंबर २०१९ मध्ये एकूण ६० कोटी रुपयांचा टोल जमा झाला होता. जानेवारी २०२३ मध्ये या रस्त्यावर १०२ कोटी रुपये टोल जमा झाले, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टसचा अभ्यास करताना स्पष्ट होते. म्हणजे सव्वातीन वर्षांत मासिक टोल कलेक्शनमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. तरीही एक एप्रिलपासून टोलदरात १८ टक्क्यांनी दरवाढ करण्यात येणार आहे.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

२००८ च्या राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमानुसार प्रत्येक टोलनाक्याबाबत तेथील परिस्थितीनुसार टोल दर ठरवण्याचा अधिकार महामंडळास आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर आता कोणताही बोजा नाही आणि मार्गावरील वाढती वाहनसंख्या पाहता खरेतर टोल कमी करण्याचे धोरण राबवायला हवे आहे. महामंडळ आणि कंत्राटदारांसाठी ही टोल कंत्राटे सोन्याची अंडी देणारी ठरत आहेत. १८ टक्के टोलवाढ ही अवाच्या सव्वा आहे. त्यामुळे टोलवाढ ही तर पूर्णपणे अतार्किक व प्रवाशांना लुबाडणारी आहे.
- मुकुंद किर्दत, आम आदमी पक्ष

देशातील माल व प्रवासी वाहतूक करणारी व्यावसायिक वाहने व खासगी वाहनधारकांना या वाढीचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या एकदम दरवाढीचा पुन्हा विचार व्हावा. ही दरवाढ वाहनचालकांना परवडणारी नाही. आता कुठे देशातील व राज्यातील माल-प्रवासी वाहतूकदार कोरोना व इतर आर्थिक संकटांतून सावरत असताना ही वाढ होत आहे.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com