
संपामुळे रखडलेली दस्तनोंदणी सुरू गर्दी टाळण्यासाठी आज सुरू राहणार कार्यालये
पुणे, ता. २९ : दरवर्षीप्रमाणे यंदाही १ एप्रिल रोजी नवे बाजार मूल्यदर (रेडीरेकनर) लागू होणार आहेत. रेडीरेकनर दरात वाढ होण्याची दाट शक्यता असल्याने मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांत मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. ३०) श्रीराम नवमी असल्याने शासकीय सुटी असली, तरी नागरिकांच्या सोईसाठी शहरातील सर्व दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे.
याबाबतचे आदेश पुणे शहराचे मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश खोमणे यांनी प्रसृत केले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मिळून २७ दस्तनोंदणी कार्यालये आहेत. पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील दुय्यम निबंधक कार्यालये गुरुवारी सुरू ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली होती. १ एप्रिल रोजी रेडीरेकनर दर प्रसिद्ध केले जातात. तसेच मार्च महिना आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने अनेक नागरिक या महिन्यात त्यांच्या दस्तांची नोंदणी करण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे मार्च महिन्यात दस्तनोंदणीसाठी मोठी गर्दी होते. ती टाळण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील २७ दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी शहरातील सर्व आणि ग्रामीण भागातील दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी १४ ते २० मार्च असा सात दिवस शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्याकाळात राज्यातील दस्तनोंदणी ठप्प झाली होती. दरवर्षी मार्चअखेर दस्तनोंदणीसाठी गर्दी होते. २१ मार्चपासून कार्यालये सुरू झाल्याने रखडलेल्या दस्तनोंदणी आता होऊ लागली आहे.