
रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य शपथ दिन
पुणे, ता. २९ : रायरेश्वर, बायोस्फिअर्स, रायरी ग्रामपंचायत, रायरेश्वर स्मारक समिती आदी संस्थांच्यावतीने मंगळवारी रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य शपथ दिन साजरा करण्यात आला. गडावरील महादेवाच्या मंदिरात अभिषेक, गड व ध्वजपूजन, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, हिंदवी स्वराज्य स्तंभ पुरस्कार वितरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तमी’ १६४५ या दिवशी त्यांच्या सहकारी मावळ्यांसह रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी डॉ. नीळकंठ शिवाचार्य महास्वामी, वनसंरक्षक विजयकुमार भिसे, डॉ. सचिन पुणेकर, युवराज जेधे, रवी भालेराव, लहू किंद्रे, दत्तात्रेय जंगम आदी उपस्थित होते, अशी माहिती आयोजक डॉ. सचिन पुणेकर यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली. हिंदवी स्वराज्य स्तंभ आरेखन स्पर्धेतील प्रथम विजेत्या केतकी कुलकर्णी, द्वितीय विजेते शुभम दिघे, तृतीय विजेते सायली खरे यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र, गौरवनिधी देऊन सन्मानित करण्यात आले.