
मुद्रांक शुल्क दरात कपात करण्याची क्रेडाईची मागणी
पुणे, ता. २९ : राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात करावी, याबरोबरच पुणे शहर व राज्यातील इतर ठिकाणी असलेले रेडीरेकनरचे दरदेखील अभ्यास करून तर्कसंगत करावेत, अशी विनंती क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात आली आहे. राज्याच्या व बांधकाम व्यवसाय क्षेत्राच्या दृष्टीने या विषय महत्त्वपूर्ण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी क्रेडाईने केली आहे.
यासंदर्भात नुकतेच क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांनी राज्य सरकारला पत्र दिले असून याचा क्रेडाई वेळोवेळी सातत्यपूर्ण पद्धतीने पाठपुरावादेखील करत आहे. मुद्रांक शुल्कातील कपातीसंदर्भात बोलताना अनिल फरांदे म्हणाले, ‘‘अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी बांधकाम क्षेत्र हे एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. कोरोनानंतरच्या आव्हानात्मक काळातूनबाहेर पडण्याचा हे क्षेत्र निर्धाराने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही सकारात्मक विचार करत मुद्रांक शुल्कात कपात करावी. सरकारचा हा निर्णय ग्राहकांसाठी फायद्याचा असून केवळ ग्राहकच नाही, तर याचा फायदा हा बांधकाम व्यवसाय क्षेत्रासोबतच महसूलाच्या माध्यमातून राज्य सरकारलादेखील होणार आहे, हे ही लक्षात घ्यायला हवे.
वाढीव मुद्रांक शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाही
मुद्रांक शुल्कात तीन टक्के कपात केल्यास घराचे हप्ते व व्याजदराचे आर्थिक ओझे काही प्रमाणात सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या खांद्यावरून कमी होईल. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास ७० ते ७५ लाखांचे घर असल्यास त्याचा हप्ता हा दरवर्षी २० ते २५ हजार रुपयांनी कमी करता येऊ शकतो. ही बाब नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारी ठरेल. आज असलेले ७ टक्के इतके मुद्रांक शुल्क हे जास्त असून मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारे नाही, याकडे क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी लक्ष वेधले.