प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

sakal_logo
By

बापट यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सच्चा कार्यकर्ता गमावला. शाळेपासून आम्ही एकत्र होतो. ५८ वर्षांची आमची साथ संपली याचे फार दुःख होत आहे. आमदार, खासदार तसेच महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. सातत्याने पुण्याचे सर्व प्रश्न लावून धरले.
- प्रकाश जावडेकर, खासदार, माजी केंद्रीयमंत्री

आम्ही दोघांनी १९७० पासून एकत्र काम केले आहे. त्यामुळे मला त्यांचा दीर्घकाळ सहवास लाभला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद पुण्यात वाढली आहे. त्यांच्या जाण्याने बापटपर्व संपले आहे. त्यांची पुण्यावर मोठी छाप असून, शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.
- प्रदीप रावत, माजी खासदार

नगरसेवक, २५ वर्षांहून अधिक काळ आमदार व मागील पाच वर्षांपासून खासदार असे एक सुहृद लोकप्रतिनिधी म्हणून मागील चार दशके त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे. पीएमआरडीएच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. पुणे महानगराच्या विकासासोबत सर्वंकष, सर्वसमावेशक विचार ठेवून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल हे त्यांच्या कारकि‍र्दीचे वैशिष्ट सांगता येईल.
- सतीश मगर, व्यवस्थापकीय संचालक, मगरपट्टा सिटी ग्रुप

बापट यांच्याशी आणीबाणी कालखंडापासून माझा संबंध आला. स्थायी समिती अध्यक्ष असताना क बजेट नावाचे बजेट निर्माण करून करून ड्रेनेज व पाणीपुरवठा यांच्यासाठी विशेष निधी निधीची व्यवस्था त्यांनी केली. पुढील काळात राज्यातील अनेक नगरपालिकांनी याप्रमाणे आपापल्या बजेटमध्ये तरतूद केली.
- श्याम सातपुते, माजी विरोधी पक्षनेता, पुणे महापालिका

गेल्या चार दशकांपासून पुणे शहराच्या सामाजिक, राजकीय व सामाजिक क्षेत्राशी जोडलेले नाव म्हणजे गिरीश बापट. अत्यंत संघर्षातून महापालिका, विधानसभा व लोकसभा सदस्य या पदांवर काम करत असताना तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे पालकमंत्रिपद भूषविताना त्यांनी जपलेले पुणेरीपण ही बाब चिरकाल स्मरणात राहील. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते.
- प्रशांत जगताप, अध्यक्ष, पुणे शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

त्यांच्या निधनाने पुणे महानगराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारा एक जाणता नेता- लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. मितभाषीपणा, दांडगा जनसंपर्क, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारे एक कर्तृत्ववान असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. नगरसेवक ते खासदार अशी त्यांची वाटचाल प्रेरणादायी आहे. लोकमान्य सोसायटीबरोबर त्यांचा एक वेगळा स्नेहबंध होता. लोकमान्य परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., पुणे

प्रचंड दांडगा जनसंपर्क, प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे नाते, राजकारणात नेहमी खेळीमेळीचे वातावरण राहावे याकडे कटाक्ष, पुणे आणि राज्याच्या प्रश्नांची चांगली जाण, राजकारणाबाहेर निखळ मैत्री, अशा अनेक गुणांचा समुच्चय म्हणजे गिरीश बापट. त्यांनी दी पूना मर्चंट चेंबर व व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे नेहमीच गांभीर्याने लक्ष दिले. त्यामुळे सर्व समाजघटकांत ते लोकप्रिय ठरले.
- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दी पूना मर्चंट चेंबर

त्यांच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे श्री कसबा गणपती मंडळ. ते मंडळाचे मार्गदर्शक होते तसेच ते स्वतःला मंडळाचा कार्यकर्ताही समजत. अडचणीच्या वेळी त्यांचे सहकार्य मिळाले नाही असे कधीच झाले नाही. मंडळाच्या बाबतीतील त्यांच्या अशा अनेक आठवणी आहेत.
- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

राजकारणातील एक चांगली व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. विविध पातळ्यांवर त्यांनी चांगले नेतृत्व केले. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात होती. एक चांगला माणूस आपल्यातून गेल्याचे दु:ख आहे.
- रशीद शेख, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

पुणे शहराचा हिरा आपण गमावला आहे. ते नेहमी सामान्य माणसांत वावरत. त्यांच्या गरजेला ते नेहमी धावून जात. बापट हे हसतमुख व्यक्तिमत्त्व होते. प्रत्येकाशी ते मित्रत्वाच्या नात्याने वागत. त्यांच्या निधनामुळे पुण्याचे मोठे नुकसान झाले आहे.
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ

२०१० साली ते ओंकारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून त्यांनी मंदिराचा वारसा जपून ठेवण्यासाठी विविध योजना आखल्या. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करीत आहोत. त्यासाठी त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या कामामुळे मंदिराचा कायापालट झाला.
- धनोत्तम लोणकर, कार्यकारी विश्‍वस्त, श्री ओंकारेश्वर देवस्थान

पुण्याच्या राजकीय संस्कृतीचा संस्कार जपणारा नेता म्हणून ते पुण्याच्या राजकीय इतिहासात कायम राहतील. समाजाच्या सर्व स्तरांतील प्रश्नांसाठी ते कायम झटत असत. विविध विषयांवर गप्पा करणारा स्वभाव व त्या गप्पांमधून लोकांची कामे मार्गी लावण्याची त्यांची कला उल्लेखनीय होती.
- बादशाह सय्यद, कवी