टेक्सासमध्ये डौलाने फडकला भगवा

टेक्सासमध्ये डौलाने फडकला भगवा

पुणे, ता. ३० : अमेरिकेतील टेक्सासची राजधानी ऑस्टिन येथील स्‍टेट कॅपिटॉल बिल्डिंगच्या (विधान भवन) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या दणक्यात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ति व त्यांचे विचार सातासमुद्रापार पोचावे या अनुषंगाने अमेरिकेत असलेल्या महाराष्ट्र माझा, ऑस्टिन या संस्थेच्‍या वतीने पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी अनेक अमेरिकन-भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी खास पालखी बनवण्यात आली होती व पारंपरिक वेशभूषेत महिला व मुलांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच लहान मुलांनी शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा या वेळी सादर केला. अमेरिका आणि टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवासुद्धा या प्रसंगी कॅपिटॉल बिल्डिंगसमोर मोठ्या दिमाखात फडकला. हा समस्त मराठी तसेच भारतीय लोकांसाठी अत्यंत अभिमानाचा, संस्मरणीय आणि भावनिक क्षण होता.

महाराष्ट्र माझा ही संस्था दरवर्षी शिवजयंती, होळी, भारतीय स्वातंत्र्यदिन, अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, दांडिया, आणि दिवाळी अशा अनेक कार्यक्रमांत ढोल-ताशांचे सादरीकरण करते. पारंपारिक ढोल-ताशा, झांज, लेझीम अशा वाद्यसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना २०१८ मध्ये करण्यात आली होती. परदेशात स्थायिक झालेल्या मराठमोळ्या नागरिकांना व त्यांच्या पुढील पिढीला आपली संस्कृती, परंपरा, इतिहास तसेच वाद्यसंस्कृती शिकवणे आणि जगातील इतर स्वयंसेवी संस्थांना मदत करणे हा संस्थेचा उद्देश आहे.
- जितेंद्र ताटे, अध्यक्ष, महाराष्ट्र माझा ढोल-ताशा, ऑस्टिन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com