हजरत पैगंबरांची शिकवण
उच्च संस्काराची दौलतच!

हजरत पैगंबरांची शिकवण उच्च संस्काराची दौलतच!

हजरत पैगंबर यांच्या उदार शिकवणीमुळे (हादीस) इस्लाम धर्मात उत्कृष्ट चालरीतींचा परिपोष झाला आहे. मनुष्याने चांगल्या रितीरिवाजांचे संवर्धन करावे असा हजरत पैगंबरांचा कटाक्ष असे. त्याकरिता ते स्वतः आदर्श घालून देत असत. कुणी त्यांना भेटले तर ते स्वतः त्यांना अभिवादन करून त्यांच्याशी हस्तांदोलन करीत व त्यांचे क्षेमकुशल विचारीत. एखादा गृहस्थ बोलू लागला तर त्याचे संपूर्ण भाषण ऐकत, मधेच (त्याला थांबवून) स्वतः बोलण्याचा मोह आवरत.
एकमेकांना अभिवादन करणे हे इस्लाम धर्मात कर्तव्य समजले जाते. मशिदीत, समारंभात, रस्त्यात किंवा कोठेही एखाद्याची गाठ पडली तर त्याला अभिवादन करून त्याच्याशी आपलेपणा प्रदर्शित केला पाहिजे. अभिवादन किती सुंदर शब्दात केले जाते ते पहा ः ‘‘अस्सलामू अलैकूम...’’ याचा अर्थ आपणास शांती लाभो असा आहे. दुसऱ्या व्यक्तीस ही तितक्याच आदर पूर्वक प्रत्युत्तर द्यावे लागते. ‘‘वअलैकूम सलाम...’’ म्हणजे आपणासही शांती लाभो असा त्याचा अर्थ आहे.
कोणाशीही बोलताना उद्धटपणे किंवा कडवटपणे बोलू नये असा हजरत पैगंबरांनी दंडक घालून दिला आहे. आपल्या वैर्यांशी बोलताना देखील आपण गोड भाषेत व विनम्रतेने बोलले पाहिजे. शिवीगाळ किंवा अभद्र भाषा या पासून प्रत्येकाने दोन हात दूर राहण्याचा हजरत पैगंबरांनी आदेश दिला आहे. एखाद्याची निंदा करणे, त्याच्यावर निष्कारण तोहमत घेणे, चार चौघात त्याची बदनामी करणे वगैरे प्रकार इस्लाम धर्मात अत्यंत निंद्य मानले जातात. स्त्रियांची नालस्ती करण्याऱ्या नीच माणसांचा तर कडक शब्दात धिक्कार करण्यात आला आहे. (पवित्र कुराण, अध्याय १८)
हजरत पैगंबराची ही शिकवण उच्च संस्काराचा किती महान संदेश देते, हजरत पैगंबराच्या शिकवणीची दौलत ज्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणली ते सुफी संत झाले. आजच्या मुस्लिम युवकांनी या अखलाकचा (संस्कार) काही प्रमाणात जर अवलंब केला तर त्यांचे जीवन निश्‍चितच यशस्वी होईल.

(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत)

इफ्तार : ६.५७ शुक्रवार सायंकाळी
सहेरी : ५.०९ शनिवार सकाळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com