‘डीआरडीओ’च्या उपकरणांना आफ्रिकी देशांची पसंती
‘यूएक्सओआर’, ‘दक्ष’, ‘आरओव्ही’चा समावेश : काही देशांकडून खरेदीची इच्छा व्यक्त

‘डीआरडीओ’च्या उपकरणांना आफ्रिकी देशांची पसंती ‘यूएक्सओआर’, ‘दक्ष’, ‘आरओव्ही’चा समावेश : काही देशांकडून खरेदीची इच्छा व्यक्त

पुणे, ता. ३१ : भारत-आफ्रिका यांच्यातील लष्करी युद्ध सराव नुकताच पुण्यात पार पडला. या सरावादरम्यान नागरी वस्तीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्‍ल्यात स्फोटके निकामी करण्यासाठी तसेच शांतता मोहिमेत उपयुक्त अशा आधुनिक उपकरणांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली होती. ही आधुनिक उपकरणे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर अँड डीई) या प्रयोगशाळेने विकसित केली असून, आफ्रिकेच्या काही देशांनी ही उपकरणे घेण्याची इच्छा व्‍यक्‍त केली आहे.

सरावात डीआरडीओच्या ‘अनएक्सप्लोडेड ऑर्डिनन्स हँडलिंग रोबॉट’ (यूएक्सओआर), दक्ष आणि सर्व्हेलन्स रिमोटली ऑपरेटेड वेहिकल (आरओव्ही) या तीन उपकरणांचा समावेश होता. दहा किलोग्रॅम ते एक हजार किलोग्रॅमपर्यंतच्या विस्फोटकांना निकामी करण्याची क्षमता असलेल्या या उपकरणांना कसे हाताळायचे यासाठीचे प्रशिक्षण या सरावादरम्यान भारत आणि आफ्रिकी देशांच्या लष्कराला देण्यात आले. हे प्रशिक्षण लष्करी सरावाच्या ‘ट्रेन द ट्रेनर’ या संकल्पनेंतर्गत आर अँड डीईचे (अभियांत्रिकी) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या गटाने दिले. यासाठी आर अँड डीईच्या शास्त्रज्ञांचे चमू २३ फेब्रुवारीपासून कार्यरत होते. महत्त्वाचे म्हणजेच लष्कराद्वारे वापरल्या जाणाऱ्या इतर उपकरणांसोबत या तिन्ही उपकरणांनी योग्यरीत्या समन्वय साधला. ज्यामुळे दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया करताना लष्कराला जीवितहानी रोखणे तसेच आव्हानांना सामोरे जाणे शक्य झाल्याचे सरावातून दाखविण्यात आले.

एखादा बॉम्ब, न फुटलेले क्षेपणास्त्र किंवा भूसुरूंग स्फोटके यांना निकामी करणे सशस्त्र दलांसमोर सर्वाधिक आव्हानात्मक कार्य ठरते. यामुळे जीवितहानीचा धोकाही वाढतो. या संयुक्‍त सरावाच्या निमित्ताने आफ्रिकी देशातील लष्करप्रमुखांनी या सर्व उपकरणांची पाहणी केली. आफ्रिकी देशांमध्ये ही समस्या अधिक असून, विस्फोटके निकामी करण्याऱ्या उपकरणांची गरज असल्याने या उपकरणांच्या खरेदीशी निगडित चर्चा करण्यात येणार असल्याचे आफ्रिकी देशांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

सरावात वापरण्यात आलेली उपकरणे
१) ‘अनएक्सप्लोडेड ऑर्डिनन्स हँडलिंग रोबॉट (यूएक्सओआर) : यूएक्सओआर हे एक किलोमीटर अंतरावरून एक हजार किलोग्रॅमपर्यंतच्या न फुटलेल्या क्षेपणास्त्रे किंवा बॉम्‍बला हाताळण्यास तसेच निकामी करण्यास उपयुक्त.

२) दक्ष : हे सुधारित आवृत्तीचे स्फोटक उपकरण ओळखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी उपयुक्त असून, याचा उपयोग आण्विक आणि रासायनिक दूषित पातळीचे सर्वेक्षण व निरीक्षणासाठीही केला जाऊ शकतो. हे उपकरण जिना चढण्यासही सक्षम असून, ते साधारणपणे तीन तासापर्यंत कार्यरत राहू शकते. याला वायरलेस पद्धतीने सुमारे ५०० मीटर अंतरावरूनही नियंत्रण केले जाऊ शकते.

३) सर्व्हेलन्स रिमोटली ऑपरेटेड वेहिकल (आरओव्ही) : हे रोबॉटिक वाहन ‘सर्व्हेलन्स’साठी (पाळत ठेवणे) उपयुक्त. याचा वापर दक्ष या उपकरणाला साहाय्यक म्हणून केला जातो. यावर असलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष वेळेत (रिअल टाइम) पाळत ठेवणे शक्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com