‘आरटीई’साठी सोडत 
पुढील आठवड्यात

‘आरटीई’साठी सोडत पुढील आठवड्यात

पुणे, ता. ३१ : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत (लॉटरी) एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
आरटीईनुसार खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेतंर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि ते स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६५ हजार १२५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने कोणत्या विद्यार्थ्यांना सोडतीत प्रवेश मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर पालक प्रवेशाची सोडत जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
ही प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागातर्फे तयारी केली जात आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडत जाहीर केली जाईल. त्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. यंदा आरटीईनुसार २५ टक्के आरक्षित जागांसाठी राज्यातून सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आले आहेत. पुणे जिल्ह्यातील ९३६ शाळांमधील १५ हजार ६५५ जागांसाठी ७७ हजार ५५० अर्ज आले आहेत. तर प्रवेशासाठी नागपूरमधून ३६ हजार ५२५, ठाण्यातून ३१ हजार ६८२, नाशिकमधून २२ हजार १२२, औरंगाबादहून २० हजार ७७९, जळगावमधून ११ हजार २९०, तर नांदेडमधून ११ हजार ११६ अर्ज आले आहेत.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://rte25admission.maharashtra.gov.in/

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com