स्वच्छ प्रतिभेचा चौकीदार

स्वच्छ प्रतिभेचा चौकीदार

पुस्तक लिहून पूर्ण झाल्यावर, पुस्तक छापून बाहेर येण्यापूर्वी तावून-सुलाखून पैलू पाडणारा, दर्जाविषयी विलक्षण जागरूक असणारा, रविप्रकाशच्या रूपाने चौकीदार लाभला याचा आम्हाला अभिमान आहे. या साध्या-सरळ-सज्जन माणसाची एक्काहत्तरी साजरी होतीय. रवीने आणखी अनेक वर्षे साहित्यातील निकृष्टता दूर करून स्वच्छ प्रतिभेचा प्रकाश आम्हाला द्यावा, हीच मनोमन इच्छा !
- राजीव बर्वे, लेखक, प्रकाशक दिलीपराज प्रकाशन

रवीची आणि माझी मैत्री होऊन किमान तीस वर्षे होऊन गेली. प्रदीप निफाडकरने ‘रवीविषयी काही लिही’, असा आदेश दिल्यानंतर मी आठवू लागलो की केव्हापासून बरे रवी आपल्या संपर्कात आला? आणि साधारण १९९५ पर्यंत मागे गेलो! माझे वडील दिलीपराजकडे आलेली हस्तलिखिते तपासत. १९८१ मध्ये अचानक त्यांचे देहावसन झाले, त्यानंतर त्यांचे मित्र प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा ते काम करू लागले. १९८९ मध्ये आमची संस्था कंपनी झाली. एकट्या शंकर सारडांकडून काम निपटेना म्हणून आणखी एक सक्षम परिक्षक अर्थात रविप्रकाश कुलकर्णी संपर्कात आला.
रवीने दिलीपराजसाठी हजाराहून अधिक हस्तलिखिते आजवर नक्की वाचली असतील. वाचायला पुस्तक पाठविल्यावर कधी त्यांच्याकडून तक्रार नाही की वेळेवर परीक्षण न आल्यामुळे आम्हाला तगादा लावावा लागला नाही. हस्तलिखितांबाबत निर्णय घेण्यासाठी रवीवर अजिबात दडपण येत नाही. प्रसिद्ध लेखक बाबा कदम यांच्या सुविद्य पत्नी माई कदम यांनी आत्मचरित्र लिहून आमच्याकडे पाठविले. मी भीत भीतच आत्मचरित्र रवीकडे पाठवले. स्क्रीप्टच्या प्रत्येक पानावर मागच्या बाजूला सूचना व दुरुस्त्या त्याने लिहिल्या होत्या आणि शेवटी त्याने माईंसाठी दोन ओळी लिहिल्या होत्या, ‘तुमच्याकडे पेशन्स आहेत म्हणून येवढे मोठे बाड तुमच्याकडून लिहून झाले. मी सांगितल्याप्रमाणे नव्याने सर्व लिहावे. वाचनीयता येण्याच्या दृष्टीने गडद घटना आणखी हव्या आहेत. शीर्षकही बदला. माईंनी सगळ्या दुरुस्त्या केल्या आणि ‘दोन घडीचा डाव’ हे लेखक पत्नींच्या रांगेत नोंद करावे, असे आत्मचरित्र आकाराला आले.
इसाक मुजावरांच्या ‘आई-माँ-मदर’ आणि ‘फ्लॅशबॅक’ या दोन पुस्तकांच्या संहिता आपल्याकडे आल्या होत्या आणि दुर्दैवाने इसाकभाई निवर्तले. इसाक मुजावरांचे अक्षर भयंकर! डीटीपी ऑपरेटर अनेक ठिकाणी अडखळू लागली. मात्र रवीने त्या दोन पुस्तकांवर एवढे कष्ट घेतले आणि अवाढव्य काम केले की ‘पूछो मत’। गंगाधर गाडगीळांची शेवटची कादंबरी, न्या. माधवराव रानडे यांच्या जीवनावरची ‘मन्वंतर’ खूप मोठी कादंबरी. पण रवीने अभिप्राय देताना काही सूचना पाठवल्या. आम्ही त्या गंगाधर गाडगीळांकडे पाठविल्या. गाडगीळांनी त्या वाचून ‘मला खेद होतोय...’ वगैरे टिपणी केली; पण दुरुस्त्याही करून दिल्या. दुर्दैवाने पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले आणि पुस्तकावर शेवटचा हात मात्र रविप्रकाशने फिरवून दिला.
‘अनेक लेखकांना केवळ रविप्रकाशमुळे मोठाली बक्षिसे मिळाली आहेत,’ असे विधान मी केले तर त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती असणार नाही. रेखा बैजल, प्र. सु. हिरूरकर, सुहास बारटक्के, गिरिजा कीर अशा अनेक लेखकांच्या पुस्तकांची उदाहरणे येथे सांगता येतील. परखड आणि ओजस्वी वक्ते म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एका माजी संमेलनाध्यक्षांच्या संहितेची रवीने सोदाहरण आणि वस्तुनिष्ठ पुरावे देऊनइतकी चिरफाड करून ते स्क्रीप्ट आम्हाला परत पाठवायला लावले. यानंतर त्यांनी पुढची संहिता तयार झाल्यावर ‘तुमच्या टीममधल्या रविप्रकाश कुलकर्णींना वाचायला देणार नसाल तर पुस्तक देतो’ असे सांगून आमच्याकडे हस्तलिखित दिले होते. ही काय सुंदर पावती होती! मी त्यांना ‘बरं’ म्हणून ते स्क्रीप्ट रवीलाच पाठवले. सुदैवाने या वेळेला होकारात्मक अभिप्राय आल्यावर माझा जीव भांड्यात पडला.

PNE23T34094

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com