संपला सिलिंडर 
नवरोबा गॅसवर!

संपला सिलिंडर नवरोबा गॅसवर!

‘‘अहो प्लीज मला दुकानातून मिठाचा पुडा आणून देता का?’’ श्रेयाने शैलेशला विचारले.
‘‘काय? मिठाचा पुडा आणायला मला सांगतेस? एका खासगी कंपनीतील अधिकाऱ्याला असलं किरकोळ आणि फालतू काम सांगतेस? मला जमणार नाही.’’ शैलेशने रागाने म्हटले.
‘‘अहो, घरात मिठाचा कण नाही. मी स्वयंपाक करतेय. प्लीज तेवढं काम करा ना.’’ श्रेयाने म्हटले.
‘‘घरातील मीठ संपलंय, हे तुझ्या वेळीच लक्षात यायला हवं होतं. तुझ्याकडे नियोजनाचा अभाव आहे, याला मी काय करू? चूक तुझी आहे, तूच निस्तर.’’ शैलेशने तिला उपदेशाचा डोस पाजला. त्यानंतर मात्र, श्रेया नाइलाजाने दुकानात गेली व मिठाचा पुडा घेऊन आली.
‘‘अहो, ए विंगमधील मानसी मला दुकानात भेटली. बिचारी फारच काळजीत होती.’’ श्रेयाने म्हटले.
‘‘का काय झालं?’’ शैलेशने उत्सुकतेने विचारले.
‘‘अहो, तिच्या घरचा सिलिंडर संपला आहे. तिच्या घरी कोणी नाही. आपल्या घरातील सिलिंडर नेऊन देता का?’’ श्रेयाने विनंती करत म्हटले.
त्यावर शैलेशने मुद्दाम आढेवेढे घेतले.
‘‘अहो, तिचा नवरा परगावी गेला आहे. त्यातच त्या विंगमधील लिफ्टही नादुरुस्त आहे. पाच मजले चढून सिलिंडर नेणे, तिला जमणार आहे का? अशावेळी आपण शेजारधर्म पाळायला नको का? ’’ श्रेयाने म्हटले.
‘‘ठीक आहे. तू म्हणतेस म्हणून नेतो.’’ मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतानाही, चेहऱ्यावर दुःख दाखवत तो म्हणाला. त्यानंतर सिलिंडर खांद्यावर घेऊन, तो खाली उतरला व पटापट चालत त्याने ‘ए’ विंग गाठली. पाच मजले चढून, त्याने मानसीच्या घराची बेल वाजवली. मानसीने दरवाजा उघडला.
‘‘वहिनी, सिलिंडर घेऊन आलोय.’’ शैलेशने म्हटले.
‘‘भावोजी, गॅस एजन्सीत कधीपासून नोकरी करायला लागले?’’ वहिनींनी हसत म्हटले.
‘‘अहो, तुमचा सिलिंडर संपला म्हणून श्रेयाने मला सिलिंडर घेऊन पाठवलंय.’’ शैलेशने म्हटले.
‘‘काहीतरीच काय? मी कालच सिलिंडर जोडलाय. मला नकोय.’’ मानसीने म्हटलं. वहिनींचं बोलणं ऐकून शैलेश बुचकाळ्यात पडला.
‘श्रेयाने मानसी म्हटलं मालती म्हटलं? का मायाचं नाव घेतलं होतं. आपलाच काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय.’ मनातल्या मनात शैलेश म्हणाला.
मग नाइलाजाने त्याने सिलिंडर उचलला व ‘बी’ विंगमधील मालतीच्या घरी गेला. मात्र, तिथेही ‘मी सिलिंडरबाबत काहीच बोलले नाही. आमचा सिलिंडर भरला आहे.’ असं तिने सांगितले. ‘आता आलोच आहे तर मायाच्या घरी चौकशी करावी’, असं त्याने ठरवलं व तिच्या घरी गेला. मात्र, तिनेही कानावर हात ठेवले. मग मात्र शैलेशची सटकली.
आपल्याला मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने श्रेयाने आपल्याला सोसायटीभर सिलिंडर घेऊन हिंडवलं, असा संशय त्याला आला व तो तणतणतच घरी आला. जोरजोराने बेल वाजवू लागला.
‘‘श्रेया, माझी काय चेष्टा चालवली आहेस का? कोणीही सिलिंडर मागितला नव्हता. मी आपला मुर्खासारखा प्रत्येकीच्या घरी खांद्यावर सिलिंडर घेऊन नाचत होतो. मला किती त्रास झाला माहिती आहे? माझा खांदा आता दुखतोय.’’ शैलेशने रागाने म्हटले.
त्यावर मोठ्याने हसत श्रेया म्हणाली, ‘‘तुम्हाला एक किरकोळ काम मी सांगितलं तर माझ्यावर किती आगपाखड केली. मात्र, शेजारणीला सिलिंडर देण्यासाठी पाच-पाच मजले हसत हसत चढून जाताय? मिठाचा पुडा आणताना तुमच्यातील वरिष्ठ अधिकारी जागा होतो. मात्र, परस्त्रीला सिलिंडर नेऊन द्यायचं म्हटलं की अंगात कसा उत्साह येतो. खांद्यावर सिलिंडर घेऊन जाताना, तुमच्यातील अधिकारी कोठे दडून बसतो? कोठे फेडाल ही पापं?’’ श्रेयाने रागाने म्हटले. त्यावर शैलेश रागाने काही बोलणार, तेवढ्यात ती जोरजोरात टाळ्या वाजवत म्हणाली, ‘‘एप्रिल फूल ! ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com