
कोयत्याने तुकडे केलेला हात परत जोडला
पुणे, ता. १ : काही कारणांनी मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले. वार इतके भयंकर होते की त्यामुळे २३ वर्षीय मुलाचा डावा हात मनगटापासून तुटून त्वचेवरच्या आधारावर लोंबकळत होता. त्याच हाताची तीन बोटेही लटकत होती. डोक्यालाही खोक पडली होती. अशा अवस्थेतील रुग्णाला पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी फक्त जीवनदानच नाही, तर त्याचे तुटलेले अवयवही परत जोडून दिले.
सातारा रस्त्यावर आठ दिवसांपूर्वी घडलेली ही घटना. शहरात त्या वेळी कोयता गँगची चर्चा होती. त्याच वेळी मित्रा-मित्रांमधील वाद विकोपाला गेला. एक मित्राने कोयत्याने दुसऱ्यावर एका मागोमाग एक वार केले. ज्याच्यावर वार केले तो २३ वर्षांचा मुलगा आहे. कोयत्याचा वार त्या मुलाच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसला. ते मनगट तुटून लोंबकळू लागले. त्याच हाताची तर्जनी, मधले बोट आणि अनामिका या बोटांवरही घाव बसला. तीदेखील फक्त त्वचेच्या आधारावर लटकत होती. कोयत्याचा एक वार त्याच्या डोक्यालाही लागला होता. छातीवरही कोयत्यामुळे जखमा झाल्या होत्या. कवटीलाही मार बसला होता. अशा रुग्णाला रात्री एक वाजण्याच्या सुमारास पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तुटलेल्या रक्तवाहिन्या आणि हाडे
पूना हॉस्पिटलमधील मायक्रोव्हॅस्क्युलर अँड कॉस्मेटिक सर्जन डॉ. अभिषेक घोष यांनी रुग्णावर शस्त्रक्रिया केली. ते म्हणाले, ‘‘कोयत्याचे वार इतके भीषण होते की, मनगट, कोपरा, हाताच्या बोटांचे तुकडे पडले होते. तेथील धमन्या आणि अवयवांपर्यंत रक्त पोचविणाऱ्या नसा तुटल्या होत्याच. पण, कोयत्याचा वार इतका मोठा होता की हाडेही तुटली होती. जखमेतून मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.’’
अशी केली शस्त्रक्रिया
रुग्णावर पहाटे साडेपाच वाजता शस्त्रक्रियेला सुरवात करण्यात आली. ही शस्त्रक्रिया दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती. सलग साडेआठ तास मायक्रो सर्जरी करून रुग्णाचा हात, बोटे, कोपरा पुन्हा जोडण्यात वैद्यकीय पथकाला यश आले. त्याबाबत डॉ. घोष म्हणाले, ‘‘डाव्या हाताच्या मनगटातील दोन धमन्या आणि नसा तुटलेल्या होत्या. त्या सुरवातीला जोडण्यात आल्या. त्यानंतर शस्त्रक्रिया करून १४ स्नायूबंध जोडण्यात आले. हाताचा कोपरादेखील तुटला होता. तो जोडण्यासाठी तेथील सहा स्नायुबंध प्रत्येकी तीन धमन्या आणि नसा जोडण्याचे आव्हान होते. एक-एक करून कोपरा, मनगट आणि हाताच्या बोटांच्या धमन्या, नसा आणि हाडे जोडण्यात आली. आता रुग्णाच्या तुटलेल्या अवयवांपर्यंत पुन्हा रक्त प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे तुटलेले अवयव जोडण्यात यश आले.’’ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राजन कोठारी यांनी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियांमुळे रुग्णाचे अवयव वाचविण्यात शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले.
एका ठिकाणी तुटलेल्या धमन्या, नसा, स्नायूबंध आणि हाडे जोडणे हेच मोठे आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे असते. या रुग्णावर झालेल्या वारामुळे दोन-दोन ठिकाणी अवयवांचे तुकडे पडले होते. त्याच वेळी डोक्यालाही मार होता. यामुळे शस्त्रक्रियेतील आव्हान आणखी वाढले होते.
- डॉ. अभिषेक घोष, मायक्रोव्हॅस्क्युलर अँड कॉस्मेटिक सर्जन, पूना हॉस्पिटल
PNE23T34295
पुणे ः यशस्वी उपचार झालेल्या रुग्णासमवेत डॉक्टरांची टीम.