करिअरची दिशा ठरविताना विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरित व्हावे ‘सकाळ विद्या’, ‘विद्यालंकार’तर्फे आयोजित मार्गदर्शन शिबिरात तज्ज्ञांचा सल्ला
पुणे, ता. २ : ‘‘विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा स्वत: ठरविणे आवश्यक आहे. आपण ठरविलेल्या करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरित होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी स्वयंप्रेरित झाले तरच त्यांना कोणत्याही प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करून नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविता येईल,’’ असा सल्ला मार्गदर्शक प्रा. हितेश मोघे यांनी दिला.
‘सकाळ विद्या’ आणि ‘विद्यालंकार इन्स्टिट्यूट’ यांच्या वतीने विविध प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मोघे बोलत होते. कार्यक्रमात वक्ते प्रा. प्रकाश जकातदार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी, प्युअर सायन्स आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमातील नामांकित संस्था, विविध प्रवेश परीक्षा आणि त्याची तयारी कशी करावी, विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करावी, पालकांची भूमिका काय याबाबत प्रा. मोघे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘ विद्यार्थ्यांनी पालकांच्या दबावानुसार क्षेत्र न निवडता स्वयंप्रेरणेतून करिअरची दिशा ठरवावी. ध्येय निश्चित केले की त्या दिशेने जाण्याचा मार्ग सुकर होतो. करिअरची दिशा निवडल्यावर त्यासंदर्भातील अभ्यासक्रमांची नामांकित महाविद्यालये आणि त्यांचा आवार पाहून यावा, जेणेकरून ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यानंतर संबंधित संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षेची जोमाने तयारी करावी.’’
प्रा. जकातदार म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या या प्रवासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. अभ्यासक्रमाविषयी मनात प्रश्न राहिल्यास गोंधळ वाढतो. त्यामुळे अभ्यास करताना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उकल होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांशी संवाद साधावा, यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. तसेच विविध प्रवेश परीक्षांची तयारी करताना सराव परीक्षा देणे महत्त्वाचे आहे. कारण सराव परीक्षेतून आपण कोठे कमी पडतोय, हे लक्षात येते आणि जेथे कमी पडतो तो अभ्यास करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा.’’ प्रवेश परीक्षांची तयारी करताना शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून शिकणे, स्वत: अभ्यास करणे आणि सराव परीक्षा देणे, हे महत्त्वाचे असल्याचेही जकातदार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तरांच्या सत्रात मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
.........
विविध प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
- अभ्यास करताना पडणारे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारावेत
- नियमित अभ्यास करायला हवा
- जास्तीत जास्त सराव परीक्षा द्याव्यात
- सराव परीक्षांमध्ये आपण कशात कमी पडतोय हे पाहून त्यावर लक्षकेंद्रीत करावे
- गॅझेटस् आणि सोशल मीडिया यांपासून दूर राहावे