
घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पतीवर चाकूने वार
पुणे, ता. २ : घरखर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे पत्नीने पतीवर चाकूने वार केल्याची घटना कोंढव्यातील शिवनेरीनगरमध्ये घडली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इम्रान खान (वय ४६, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे जखमी पतीचे नाव आहे. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी इम्रानचे वडील उस्मान आमीर (वय ७१) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नाझनीन इम्रान खान (वय ४३) हिच्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सणाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नाझनीन हिने पती इम्रानकडे घरखर्चासाठी पैसे मागितले होते. परंतु इम्रानने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावरून नाझनीन आणि इम्रान यांच्यात जोरदार भांडण झाले. या वेळी नाझनीन हिने रागाच्या भरात स्वयंपाकघरातील चाकूने इम्रानच्या पोटावर आणि छातीवर वार केले. त्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे इम्रानला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.