लघुउद्योगनगरीला समस्यांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लघुउद्योगनगरीला समस्यांचा विळखा
लघुउद्योगनगरीला समस्यांचा विळखा

लघुउद्योगनगरीला समस्यांचा विळखा

sakal_logo
By

दत्ता सावंत ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २ ः महापालिकेचा भरमसाट मिळकत कर, वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमुळे नऱ्हे, धायरी, नांदेड गावातील लघुउद्योगनगरी सध्या समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर करात तिप्पट झालेली वाढ पेलवणारी नसल्याची भावना येथील उद्योजकांनी व्यक्त केली. उद्योगांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांकडे महापालिकेने लक्ष देऊन त्या तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

अशी झाली सुरवात
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात नऱ्हे, आंबेगाव, धायरी, नांदेड या भागात लघु व मध्यम स्वरूपातील उद्योगांचे जाळे पसरलेले आहेत. विठ्ठलवाडीतून १९८० च्या सुमारास या उद्योगांच्या विस्तारीकरणाला सुरवात झाली. मात्र, महापालिकेत विठ्ठलवाडी समाविष्ट झाली आणि शहरीकरण वाढू लागले. भाडेतत्त्वावरील जागांवर निवासी आणि व्यावसायिक बांधकामांनी जोर धरला. तसेच महापालिकेने या उद्योगांना तीन टक्के जकात कर लागू केला होता. तो परवडणारा नव्हता. त्यामुळे १९८८ ते ८९ च्या सुमारास हे उद्योग धायरी, नऱ्हे, आंबेगाव, नांदेड भागाकडे सरकले. या गावठाणांत मुबलक जागा, मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने तेथे व्यवसाय विस्तारीकरण आणि वृद्धीला संधी निर्माण झाल्या. आज या तीनही परिसरात लघु आणि मध्यम स्वरूपाचे सहा हजार उद्योग सुरू आहेत.

या भागातील उद्योगांचे स्वरूप
- छोट्या उत्पादन सेवा
- इंजिनिअरिंग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांची कामे
- फॅब्रिकेशनपासून लेथ मशिन, गाड्यांचे सुटे भाग
- प्लास्टिक बॅरल, बाटल्या, कॅन, डबे तयार करणे
- कागद तयार करण्यापासून पुठ्ठे, वह्या, पुस्तकांची छपाई
- किचन ट्रॉलीपासून फर्निचर साहित्य
- मोठ्या कंपन्यांसाठी लागणारी विविध रसायने

अशी होते उलाढाल
या भागात सुमारे सहा हजार लघुउद्योग असून, अगदी पाच कामगारांपासून १८० जणांचे मनुष्यबळ येथे काम करते. साधारणः येथील लघुउद्योजकांची मासिक उलाढाल दोन लाख, तर मध्यम व त्यापेक्षा काही मोठ्या उद्योगांची एक ते दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल जाते. येथील उत्पादने बुहतांश कोल्हापूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, चाकण या भागात पाठविली जातात. तर मोठे उद्योजक त्यांची उत्पादने दिल्ली, चेन्नई, बंगळूर आणि परदेशात पाठवतात. या लुघउद्योगनगरीमुळे साधारणतः ४० हजार जणांचे कुटुंबे चालते.

या समस्यांचा करावा लागतो सामना
- ‘डीपी’नुसार एकाही रस्त्याचा विकास नाही
- अरुंद रस्त्यांमुळे मालाची वाहतूक करणे अवघड
- वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसा मालवाहतुकीला मर्यादा
- महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही
- उद्योगांसाठी पाण्याची वेगळी व्यवस्था नाही 
- उद्योगांच्या जागांची गुंठेवारी नाही, त्यामुळे विविध सरकारी सुविधांचा लाभ नाही
- जागा एनए नसल्याने बँक कर्ज देत नाही
- रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अडचणी

पुण्यातील उद्योगांची स्थिती
२ लाख ३४ हजार
- एमएसएमई युनिट  

१४ लाख ३० हजार लोकांना
- रोजगार

६९४
- मोठे उद्योग  

५ लाख ५० हजार जणांना
- रोजगार

२,२००
- इतर उद्योग  

५ लाख जणांना
- रोजगार

५ लाख नागरिक
- सेवा क्षेत्रातून रोजगार


लघुउद्योग क्षेत्राला अपेक्षित बाबी
- महापालिकेने उद्योगांचा सर्व्हे करून उद्योग स्वरूपानुसार कर रचना करावी, कराचे टप्पे निश्चित करावेत
- सरसकट करप्रणालीचा सर्वाधिक फटका
- जागांना उद्योग क्षेत्राचा दर्जा द्यावा
- कर्ज त्वरित व कमी व्याज दरात मिळावे
- उद्योगाची प्रक्रिया सोपी व्हावी
- सवलतीच्या दरात सुविधा द्याव्यात 
- व्यावसायिक मिळकत करात सवलत मिळावी 

करात भरमसाट वाढ
नांदेड भागातील दोन लघु उद्योजकांनी महापालिकेच्या कराची माहिती दिली. ग्रामपंचायतीत असताना एकाला १७ हजार आणि दुसऱ्याला १० हजार एवढा कर येत होता. आता गाव महापालिकेत असल्याने हाच कर तब्बल ७० टक्के वाढून अनुक्रमे एक लाख २० हजार आणि एक लाख २५ हजार एवढा आला आहे. त्यामुळे या उद्योजकांसमोर आर्थिक गणित सांभाळण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

महापालिकेने भरमसाट कर आकारला आहे. त्या तुलनेत कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. उद्योगांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. नांदेड फाटा चौक ते आमच्या कंपनीपर्यंतचा रस्ता खूपच अरुंद आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो.
- अशोक भगत,
अविनाश इंजिनिअर्स, नांदेड

या भागातील एकही रस्ता विकास आराखड्यानुसार झालेला नाही. जेमतेम पुरेल एवढेच रस्ते आहेत. मात्र त्यावरही अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे मालाची वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागते.
- भास्कर कुलकर्णी,
सुपर टेक, नांदेड

माझी कंपनी नऱ्हे भागात असून, आमच्याकडे नट बोल्टचे उत्पादन घेतले जाते. येथील पारी चौक, श्री कंट्रोल चौक या दोन ठिकाणी वाहतूक कोंडी कायम असते. रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणांमुळे हा प्रश्न गंभीर स्वरूपात भेडसावत आहे. रस्त्यांची रुंदी बऱ्यापैकी पुरेशी असली तरी दुकानांसमोरील पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे मालाची वाहतूक करण्याचे आव्हान असते. 
- राजेंद्र गोरडे,
हायटेक काॅम्पोनंट्स, भागीदार, नऱ्हे

तुमचे मत मांडा...
नऱ्हे, धायरी, नांदेड परिसरातील लघुउद्योगनगरीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पायाभूत सुविधा देण्याकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याबाबत तुमचे मत मांडा...