पालखी सोहळ्यासाठी दोन समित्या

पालखी सोहळ्यासाठी दोन समित्या

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २५ : पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थानांच्या तसेच दिंड्यांच्या प्रमुखांनी प्रश्‍नांची जंत्री मांडल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला नियोजन करेल. तर पुढील वर्षभरात करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात दुसरी समिती नियोजन करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

दर आठवड्याला आढावा
पालखी जागा आणि सोहळ्यादरम्यान येत असलेल्या समस्यांची या संस्थांनी बैठकी दरम्यान निदर्शनास आणून दिल्या. पाण्याचे टँकर, शौचालयांची व्यवस्था रस्त्याने चालताना मंडपांची व्यवस्था झाडांची व्यवस्था अशा अनेक समस्या यावेळी संस्थानांच्या प्रमुखांनी मांडल्या. त्यावर पाटील यांनी यासंदर्भात दर आठवड्याला विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संस्थांचे प्रमुख तसेच प्रशासकीय अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती दर आठवड्याला आढावा घेऊन पालखी सोहळ्यात येणाऱ्या समस्यांच्या संदर्भात उपाययोजना करेल.

सोहळ्यानंतर स्वतंत्र बैठक
देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले,‘‘ देहू मध्ये सोहळा सुरू असताना वारकऱ्यांना थांबण्याची सोय नाही. या ठिकाणी ३५ एकर गायरान जागा आहे. हे गायरान पूर्ण वेळ संस्थानांचा वारकऱ्यांसाठी आरक्षित करावे. जेणेकरून देहूत वर्षभर येणाऱ्या वारकऱ्यांची सोय होईल. याबाबत पाटील यांनी या गायरानावर अनेक सरकारी संस्थांसह इतर स्वयंसेवी संस्थांनीही दावा केलेला आहे. त्याबाबत पालखी सोहळ्यानंतर स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी पाटील यांनी मोरे यांना दिले.

समस्या तातडीने दूर करू
सोपान महाराज संस्थानांच्या पालखी सोहळ्यात यंदा केवळ दोन टँकर देण्यात आले आहे. तसेच शौचालयांची संख्या देखील अतिशय तुटपुंजी आहे. ज्या रस्त्यावरून पालखी सोहळा जातो, त्यात अनेक खड्डे आहेत. त्यामुळे रथाला हाकताना अडचणी येत आहेत, अशी तक्रार संस्थांचे प्रमुख यांनी मांडली. त्यावर विभागीय आयुक्तांनी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यारींनी ही समस्या तातडीने दूर करण्याचे आश्‍वासन दिले.

मंडप उभारण्याची सूचना
यंदा अधिक महिना असल्याने उष्णतेचे प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात उष्माघाताचे प्रकार वाढू शकतात, अशी शंका सर्वच प्रमुखांनी व्यक्त केली त्यात आळंदीचे संस्थापक विकास ढगे पाटील यांनी सबंध पालखी मार्गाच्या मधोमध काही अंतरावर मंडप उभारण्याची सूचना केली. या मंडपामध्ये पाण्याची तसेच विसाव्याची सोय करावी अशी सूचना त्यांनी केली यावरही पाटील यांनी आश्वासन देत ही सूचना मान्य करू, असे सांगितले.

टोलमध्ये माफी देऊ
पंढरपूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर टोल सुरू करण्याचे नियोजन पुढील महिन्यात अर्थात जूनमध्ये होणार आहे. याबाबत सर्व संस्थान प्रमुखांनी हा टोल जूनऐवजी जुलैमध्ये सुरू करावा, अशी आग्रही मागणी केली. त्यावर एनएचएआय प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले की, यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे
मागणी केल्यास हा टोल जुलैमध्ये सुरू करता येईल. मात्र, पाटील यांनी तातडीने यावर हस्तक्षेप करत हा टोल जूनमध्ये सुरू झाला तरी वारकऱ्यांच्या सर्व वाहनांना मोफत पास देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश प्रकल्प संचालकांना दिले. तसेच आज नितीन गडकरी पुण्यातच आहेत हा विषय त्यांच्याशी बोलून मार्गी लावू, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com