आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या बुकींना अटक

आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या बुकींना अटक

पुणे, ता. २५ : आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन बेटिंग घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (ता. २४) रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी छत्तीसगड, पंजाब आणि बिहार राज्यातील सहा बुकींना खराडी परिसरात अटक केली असून, पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

गौरव धरमवाणी (वय २७), सुनिश लखवानी (वय २५), जपजीतसिंग बग्गा (वय २५, रा. खराडी, मूळ रा. रायपूर, छत्तीसगड), जसप्रीत सिंह (वय २९), तरणदीप सिंह (वय ३३, दोघे रा. शिवाजीनगर, लुधियाना, पंजाब) आणि लालकिशोर दुखी राम (वय ३७, मूळ रा. बीहरौना, दरभंगा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, डीके नावाचा बुकी फरार आहे. आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील सदनिकेत क्रिकेट मॅचवर बेटिंग सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी माहितीची खातरजमा केली. त्यानुसार पोलिसांनी खराडी येथील सोसायटीमधील एका सदनिकेत छापा टाकला. त्यावेळी आरोपी मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलिस हवालदार राजेंद्र कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बॅंक खाती गोठवली
आरोपींकडून १६ मोबाईल हॅन्डसेट, दोन लॅपटॉप, वायफाय राउटर आणि रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपींच्या बॅंक खात्यातील सुमारे २० लाखांची रक्कम गोठविण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com