खराडीतील नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
पुणे, ता. २६ : ईटीएस मशिन आणि रोव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून खराडीतील ७०० हेक्टरवरील मिळकतींच्या मोजणीचे काम दोन महिन्यांत भूमी अभिलेख विभागाने पूर्ण केले आहे. त्यामुळे लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून खराडीतील मिळकतदारांना कायदेशीर मालकी हक्काचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबतची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
सातबारा उतारे बंद
भूमि अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संगणक प्रणालीचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर वडगाव शेरीमध्ये जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून प्रकल्प राबविला. त्यामध्ये रोव्हर आणि ईटीएस मशिनचा वापर करून या गावाची मोजणी पूर्ण करण्याचा नवा विक्रम केला आहे.
तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर
वडगाव शेरीतील प्रयोगानंतर खराडीतील मोजणीसाठी रोव्हर, ईटीएस मशिन आणि ड्रोन अशा तिन्ही तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन महिन्यात खराडीच्या ७०० हेक्टरवरील मिळकतींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सुमारे १०० हेक्टरवरील मिळकतींची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करण्याचे काम झाले नसल्याचे भूमी अभिलेख विभागाने सांगितले.
कागदपत्रांची तपासणी होणार
खराडीचा काही भाग लोहगाव विमानतळाजवळ येतो. त्यामुळे त्याच भागात ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करावयाची आहे. परंतु लष्कराकडून परवानगी मिळत नसल्यामुळे हे काम थांबले आहे. लवकरच ही परवानगी मिळेल. त्यानंतर हे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.
प्रॉपर्टी कार्डचा फायदा काय?
प्रॉपर्टी कार्ड हे महसूलविषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकाचे हितसंबंध जोपासले जाणार आहे. प्रॉपर्टी कार्डवर इमारतीखालील सर्व क्षेत्र, तसेच प्रत्येक सदनिकाधारकाच्या वैयक्तिक मालकीच्या क्षेत्राची स्वतंत्र नोंद असणार आहे. त्यामुळे सदनिकाधारकाचा जागेवरील हक्क अबाधित राहणार आहे. तसेच सदनिकेची खरेदी-विक्री करताना उद्भवणारे वाद मिटणार आहे. एकच सदनिका वेगवेगळ्या बॅंकेकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलून फसवणूक करण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे.
सध्या काय आणि पुढे काय
- खराडी गावठाण हद्दीत प्रॉपर्टी कार्ड
- काही भागात सातबारा उतारा
- मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर सातबारा उतारा बंद होणार
- सर्वांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार
महापालिकेचा काय फायदा?
- मालकीच्या मिळकतींची हद्द निश्चित होणार
- रस्त्यांचे क्षेत्र, लांबी, रुंदीची माहिती मिळणार
- मिळकतींची संख्या निश्चित होणार
- मिळकतकराच्या माध्यमातून महसूल वाढणार
- सरकारी जमिनींची माहिती कळणार
खराडी येथील मोजणींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण करून तेथील मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात येईल.
- निरंजन सुधांशू, जमाबंदी आयुक्त
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.