‘आप’तर्फे स्वराज्य यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आप’तर्फे स्वराज्य यात्रा
‘आप’तर्फे स्वराज्य यात्रा

‘आप’तर्फे स्वराज्य यात्रा

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : आम आदमी पक्षाने (आप) आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून, पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी ‘स्वराज्य यात्रा’ आयोजित केली आहे. या यात्रेची सुरुवात रविवारी (ता. २८) पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन होणार आहे. तर रायगड येथे राज्याभिषेक दिनी (६ जून) स्वराज्य यात्रेची सांगता होणार आहे.

यात्रा सात जिल्ह्यांमधून जाणार असून, शहरे आणि गावांमध्ये सभा होणार आहेत. तब्बल ७८२ किलोमीटरचा प्रवास यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत ‘आप’चे मुकुंद किर्दत यांनी दिली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व युवा नेते गोपाल इटालिया, धनंजय शिंदे, विजय फाटके आदी उपस्थित होते. इटालिया म्हणाले, ‘‘देशातला सर्वांत मोठा पक्ष म्हणवून घेणारा भाजप महाराष्ट्रात मात्र हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही. त्यामुळेच प्रशासन मनमानी कारभार करते आहे. भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील स्वराज्य आणण्यासाठी आप प्रयत्नशील आहे.’’

या यात्रेच्या निमित्ताने विविध गावे आणि शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच संघटन अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न पक्षातर्फे होणार आहे. ‘आप’तर्फे अधिकाधिक नागरिकांना या यात्रेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. एकीकडे वाढती महागाई असताना शेतकरी, नोकरदार, पालक यांच्या प्रश्नांबाबत सरकार सोडाच; परंतु प्रस्थापित विरोधी पक्षसुद्धा आवाज उठवण्यास तयार नाही. अशावेळी सर्वसामान्यांचा आवाज बनून आप रस्त्यावर उतरू पाहत आहे, असे किर्दत यांनी सांगितले.