
डॉ. स्मिता घुले यांना पुरस्कार
पुणे, ता. २६ ः डॉक्टरांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’तर्फे (जीपीए) ‘विमेन्स कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात ‘लेडी जीपी ऑफ द इयर’ पुरस्काराने डॉ. स्मिता घुले यांचा गौरव करण्यात आला. सर्वोत्तम वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवा केल्याबद्दल डॉ. घुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘जीपीए‘ पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, कांचन पाटील-वडगावकर या वेळी उपस्थित होत्या. यावेळी ‘जीपीए‘चे अध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, खजिनदार डॉ. सुनील भुजबळ, माजी अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनवणे, ‘प्रियदर्शिनी विंग’च्या अध्यक्षा डॉ. आरती शहाडे व इतर महिला डॉक्टर यात सहभागी झाल्या होत्या.
महिला डॉक्टर आपल्या घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वैद्यकीय सेवा करीत असतात. तसेच सामाजिक कार्यातदेखील सक्रिय असतात. अशा वेळी महिला डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. डॉ. घुले यांनी यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. राजेश दोषी यांनी आभार मानले.