
ऊसतोडणी कामगारांचे आझाद मैदानावर आंदोलन
पुणे, ता. २६ : उचल वसुलीसाठी ऊसतोडणी कामगारांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या रोजगारात घट झाली आहे. असे असताना शिंदे-फडणवीस सरकार साखर कारखानदारांच्या दबावाखाली पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून ऊसतोडणी मुकादमाांवर गुन्हे दाखल करत आहे. या निषेधार्थ आयटक प्रणीत लालबावटा ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूकदार युनियन १२ जून रोजी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०२२-२३ या कालावधीत उसाचे एकरी उत्पादनात घट झाल्याचे साखर आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्याचे गंभीर परिणाम ऊसतोडणी कामगारांना भोगावे लागत आहेत. दिवसभर राबूनही उसाचे पुरेसे वजन न भरल्याने ऊसतोडणी कामगारांना संपूर्ण मंजुरी मिळत नाही, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
ऊसतोडणी कामगार-मुकादमांच्या मागण्या
- कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेले १५० गुन्हे मागे घ्यावेत
- कामगारांना थेट विशेष भत्ता द्यावा
- ऊसतोडणी व स्थलांतरित कामगारांसाठी स्वतंत्र कायदा मंजूर करावा
- मराठवाड्यात ग्रामपंचायतीद्वारे ऊसतोड कामगारांची नोंदणी करावी
- ऊसतोडणी मजुरांवरील थकीत उचल रकमेचे संस्थागत कर्जात रूपांतर करावे