पुणे-दिल्ल्लीचा प्रवास ठरला भीतीदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-दिल्ल्लीचा प्रवास ठरला भीतीदायक
पुणे-दिल्ल्लीचा प्रवास ठरला भीतीदायक

पुणे-दिल्ल्लीचा प्रवास ठरला भीतीदायक

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः आधी हवामानात झालेला बिघाड, नंतर विमानात झालेल्या बिघाडामुळे पुण्याहून दिल्लीला निघालेल्या प्रवाशांना दिल्ली गाठण्यासाठी तब्बल २४ तास खर्ची घालावे लागले. खराब हवामानामुळे दिल्लीला उतरणारे विमान जयपूरच्या दिशेने निघाले; मात्र उतरले ग्वालियर विमानतळावर. हा सगळा प्रवास भीतीदायक असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तेथून विमानाने नाही तर कॅब, बसने प्रवाशांनी दिल्ली गाठली. दिल्लीत श,हरात दाखल झाल्यावर प्रवाशांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.
पुण्याहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे एआय-८५० हे विमान २५ मेच्या सायंकाळी पुण्याहून ६ वाजून ५० मिनिटांनी दिल्लीसाठी झेपावले. ते रात्री ९ च्या सुमारास दिल्लीला पोचणे अपेक्षित होते. दिल्लीला पोचण्याआधीच वैमानिकांनी खराब हवामान असल्याचे सांगून विमान जयपूर विमानतळावर उतरवले जाईल, असे सांगितले. मात्र विमान सुमारे अडीच ते तीन तास उडतच होते. जयपूर विमानतळावर उतरण्यास ‘एटीसी’ने परवानगी नाकारली. विमानातले इंधन संपत होते. त्यामुळे ग्वालियरच्या विमानतळावर आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यात आले. त्या वेळी विमानात काहीच इंधन शिल्लक राहिले नाही. त्या दरम्यान विमानातील विजेचे दिवे व एसी बंद पडले. रात्रीचे १ वाजले होते. वैमानिकांनी केवळ आपण ग्वालियर विमानतळावर उतरलो असल्याचे सांगितले. पुढचे तीन तास प्रवाशांना अंधारात व उकाड्यात काढावे लागले. लहान मुले रडत होती. ज्येष्ठांनादेखील त्रास सहन होत नव्हता. प्रवाशांनी विमानाचे दरवाजा उघडण्याची विनंती केली. त्या वेळी दरवाजा उघडण्यात आला. मात्र हे हवाई दलाचे बेस स्टेशन असल्याने प्रवाशांना उतरण्यास परवानगी मिळाली नाही. सकाळी सहा वाजता प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर प्रवाशांना टर्मिनल गेटवर आणण्यात आले. काही प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी कॅबची, तर काही प्रवाशांना बसची व्यवस्था करण्यात आली. २६ मेच्या सायंकाळी ६ वाजता प्रवासी दिल्लीत पोचले अन् पुणे ते दिल्ली असा भीतीदायक प्रवास अखेर संपला.

पुणे-दिल्ली २ तासांना अक्षरशः २४ तास लागले; मात्र हा प्रवास भीतीदायक ठरला. अंधारात व विनाएसीचे तीन तास विमानात बसून राहणे, हे खूप त्रासदायक होते.
- मुकद्दस अन्सारी, प्रवासी