पालखी सोहळ्यासाठी आरोग्य, स्वच्छतेवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी सोहळ्यासाठी आरोग्य, स्वच्छतेवर भर
पालखी सोहळ्यासाठी आरोग्य, स्वच्छतेवर भर

पालखी सोहळ्यासाठी आरोग्य, स्वच्छतेवर भर

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : शहरात पालखी सोहळ्यादरम्यान पुणे महापालिकेकडून आरोग्य व स्वच्छतेवर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. त्यासाठी १,३००हून अधिक फिरती स्वच्छतागृहे व पालखी मार्गावर १८ ठिकाणी मोफत औषध पुरवठा व उपचार केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १२ जून रोजी पुण्यात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून पालखी मार्गावर आवश्‍यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या आवश्‍यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आरोग्य व स्वच्छतेवर भर दिला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पालखी मार्गावर ठिकठिकाणी सुमारे फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणार आहेत. पालखी मार्ग स्वच्छतेबाबतच्या सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

- १२ जून : पुण्यात पालखी आगमन
- १,३३१ : फिरती स्वच्छतागृहे
- ६५० : स्वच्छता कर्मचारी
- ६० : स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचारी

सोई-सुविधा
-औषध पुरवठा व उपचार केंद्र
-महिला कक्ष
-सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी महिला विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात येणार आहे. तेथे महिला भाविकांना विश्रांती घेता येणार आहे. याबरोबरच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सातत्याने स्वच्छता ठेवण्यात येणार आहे.
-आशा राऊत, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग

महापालिकेकडून १६ ते १८ ठिकाणी मोफत औषध पुरवठा व उपचार केंद्र असणार आहेत. हे केंद्र पालखी मार्ग, मुक्काम स्थळावर असणार आहेत. ठिकठिकाणी औषधे, रुग्णवाहिका व तत्काळ उपचारांसाठी व्यवस्था केली जाईल. त्याबाबतच्या सूचना महापालिकेच्या दवाखान्यांमधील वैद्यकीय प्रमुखांना दिल्या आहेत.
-डॉ. संजय वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका

उपचार केंद्र
खेडेकर दवाखाना (बोपोडी), दळवी हॉस्पिटल (वाकडेवाडी), कळस दवाखाना (म्हस्के वस्ती कोठी), सिद्धार्थ दवाखाना (विश्रांतवाडी चौक), राजीव गांधी दवाखाना (येरवडा), दळवी हॉस्पिटल (शिवाजीनगर), होमी भाभा हॉस्पिटल (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता), गाडगीळ दवाखाना (टिळक चौक), मालती काची दवाखाना (समाधान चौक, लक्ष्मी रस्ता), गणेश पेठ दवाखाना, सोनवणे हॉस्पिटल, डॉ. आंबेडकर दवाखाना (भवानी पेठ), शिवरकर दवाखाना (फातिमानगर चौक), छत्रपती शाहू दवाखाना (रामटेकडी बसस्टॉप), अण्णासाहेब मगर दवाखाना (हडपसर), कोद्रे प्रसूतिगृह (मुंढवा), भानगिरे दवाखाना (महमदवाडी).