अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून करणाऱ्या तिघांना मरेपर्यंत जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून करणाऱ्या तिघांना मरेपर्यंत जन्मठेप

बलात्कार प्रकरणी तीघांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप
अल्पवयीन मुलीचा बलात्कार, खूनप्रकरणी न्यायालयाचा निकाल
पुणे, ता. २८ : अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून करून तिचा मृतदेह बॅगेत भरून तळेगाव रेल्वे स्टेशन येथे टाकणाऱ्या तिघांना न्यायालयाने मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा निकाल दिला. बलात्कार, खूनासह फूस लावून पळवून नेणे, अपहरण आणि पुरावा नष्ट करणे अशा कलमांनी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राहुल रवींद्र बरई, जिशान ऊर्फ इशान हमझा अली कुरेशी, संतोष विष्णू जुगदर अशी शिक्षा झालेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
वडाळा येथे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा बलात्कार करून सहा मे २०१४ रोजी हाताने आणि ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणात विशेष सरकारी वकील लीन पाठक यांनी २८ साक्षीदार तपासले. त्यामध्ये तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आरोपी ज्या गाडीतून गेले. त्या गाडीच्या चालकाची साक्ष महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वामन कोळी यांनी शिक्षेवर युक्तिवाद केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी केला. पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विष्णू साळेकर, हवालदार दत्तात्रेय मोरे आणि नाईक निशांत कसबे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

खूनासाठी ७५ हजार रुपये
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जुगदर याने मुलीला फूस लावून नालासोपारा येथील एका इमारतीमध्ये नेले. तिथे कुरेशी आणि बरई राहत होते. तिघांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तिने पोलिसांकडे तक्रार करू नये तसेच आपल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याची माहिती तिला झाल्याने तिच्या खूनाचा करण्याचा कट रचला. जुगदर याने तिला मारण्यासाठी बरई आणि कुरेशी यांना ७५ हजार रुपये दिले. मुलीचा खून केल्यानंतर तिचा हात बांधून मृतदेह बॅगेत भरण्यात आला. कॅबमधून ती बॅग दादर येथे नेण्यात आली. तेथून स्कॉर्पिओ गाडीतून पुणे रेल्वे स्थानकाजवळील एस.टी. स्टॅन्ड येथे नेली. तेथून रिक्षातून तळेगाव येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन येथे पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ती बॅग टाकून देण्यात आली होती. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे आरोपींना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com