
रेल्वे तिकिटाचा काळाबाजार; पुणे स्थानकावर एकाला अटक
पुणे, ता. २८ ः रेल्वेच्या तत्काळ कोट्यातील तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या युवकाला वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेऊन त्या बदल्यात तिकीट काढताना शादाब अखलाख मोमीन (वय २२,रा. ग्रीन पार्क लाईन, अलिफ टॉवरच्या जवळ, कोंढवा, पुणे ) याला पकडण्यात आले. त्याच्याजवळ दोन कोरे आरक्षित तिकिटाचे फॉर्म व सुमारे ९ हजार रुपये किमतीचे आरक्षित तिकीट आढळून आले. पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी ही कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकावर एजंट व अन्य व्यक्तींकडून तिकिटाचा गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती वाणिज्य विभागाला मिळाली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाच्या अधिकारी व निरीक्षकाने पुणे स्थानकांवरील आरक्षण केंद्रावर जाऊन पाहणी केली. या वेळी शादाब मोमीनकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यावेळी आरपीएफ निरीक्षक संतोष जायभाय यांनी मोमीन यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तिकिटाचा गैरव्यवहार करीत असल्याचे कबूल केले. प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेऊन त्यांना तत्काळ कोट्यातून तिकीट काढून देत असल्याची कबुली दिली. त्याने गाडी क्रमांक १५०३० पुणे ते भूज दरम्यानचे वातानुकूलित थ्री टियरचे तिकीट काढले होते. रेल्वे प्रशासनाने संबंधित तिकीट ब्लॉक केले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी पुणे स्थानकावर घडली. रेल्वे न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे.