कॅडेट्सने सतत शिकत रहावे

कॅडेट्सने सतत शिकत रहावे

पुणे, ता. २९ ः आयुष्यात नेहमी शिकत राहण्याची भूमिका कॅडेट्सने स्वीकारली पाहिजे. नेतृत्व, अजेय, भावनिक बुद्धीमत्ता, करुणा अशा गुणांना आत्मसात करण्यावर भर द्यावा. पुढील प्रवासात अडचणी आल्या तरी त्याचा सामना करण्याची जिद्द, परिश्रमाची ताकद ठेवा असा कानमंत्र इंदूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) संचालक हिमांशू राय यांनी दिला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४४ व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा सोमवारी प्रबोधिनीत पार पडला, या वेळी ते बोलत होते

‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल संजीव डोग्रा, एनडीएचे प्राचार्य ओ. पी. शुक्ला आदी या वेळी उपस्थित होते. एनडीएच्या १४४ व्या तुकडीच्या ३६७ कॅडेट्सने विविध शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये मित्र देशातील १९ कॅडेट्सचा समावेश होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राय म्हणाले, ‘‘अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही देशसेवेसाठी रुजू व्हाल, तेव्हा एक सक्षम नेतृत्व करण्याची गुणवत्ता तुमच्यात असायला हवी. तरच एक सक्षम नेतृत्व करणारा अधिकारी म्हणून तुम्ही ओळखले जाऊ शकता.’’

विविध प्रकारचे कौशल्य, करुणा, नेतृत्व अशा विविध गोष्टी कॅडेट्सला प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविण्यावर भर दिला जातो. लवकरच अभ्यासक्रमात आणखीन नव्या गोष्टींचा समावेश केला जाईल, असे या वेळी मेजर जनरल डोग्रा यांनी सांगितले.

लष्कराला करिअर म्हणून निवड करत एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करत आता कॅडेट्सने पुढील काळात पूर्वक देशसेवा करावी. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही सोपी नसून लष्कराकडे मोठ्या आकांक्षांनी पाहिले जाते. लष्करी सेवेत विविध परिस्थितीत काम करत असताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे शिस्त बाळगत काम करणे गरजेचे आहे.
- व्हाइस ॲडमिरल अजय कोचर, एनडीए प्रमुख

गुणवंत कॅडेट्सचा सन्मान
प्रशिक्षणादरम्यान शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्तम कामगिरी करण्यात आलेल्या कॅडेट्सला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यामध्ये बीएससी शाखेत जसकरणदीप सिंग, बीएससी कॉम्प्युटर सायन्‍स शाखेत आयुष कुमार, कला शाखेत सौरव तर बी. टेकमध्ये ऋषभ मित्रा या कॅडेट्सने प्रथम क्रमांक पटकावला. यातील सौरव, जसकरणदीप आणि आयुष हे पुढे डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमीमधून प्रशिक्षण घेत सैन्यदलात जाणार आहेत. तर ऋषभ हा हवाईदल ॲकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षण पूर्ण करणार आहे.
तर प्रशिक्षणादरम्यान आलेल्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. तसेच यामुळे जीवनाला एक नवी दिशाही मिळाली आहे, अशी भावना या वेळी विविध शाखेत प्रथम आलेल्या कॅडेट्सने व्यक्त केली.

शाखा ः पदवी प्राप्त केलेले कॅडेट्स
बीएससी ः ८१
बीएससी कॉम्प्युटर सायन्स ः ९०
बी. ए ः ५९
बी. टेक ः १३७
पदवी पूर्ण करणारे कॅडेट्स - ३६७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com