राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान
राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान

राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान

sakal_logo
By

मॉन्सूनच्या आगमनाला
उशीर होण्याची शक्यता
पुणे, ता. २९ ः गेल्या आठवडाभरापासून मॉन्सूनची प्रगती मंदावली आहे. मंगळवारी (ता. ३०) मॉन्सून अंदमान समुद्र व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्यासाठी पोषक स्थिती होण्याची चिन्हे आहेत. मात्र मॉन्सूनची वाटचाल पाहता आगमनासाठी काहीसा उशीर होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.
राज्यातील तापमानाचा पारा खाली येत असताना पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
सोमवारी (ता. २९) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ४२.७ अंश सेल्सिअस इतकी झाली. काही भागांमध्ये पावसाची नोंद झाली. मंगळवारी पुणे, सातारा, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशीम, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामानाची ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ होऊ शकते.
-----