
महाड गर्भपातप्रकरणी डॉक्टरांवर दोषारोप पत्र दाखल
पुणे, ता. २९ : महाडमध्ये बेकायदा गर्भपातातून स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टरांनी गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांनी दिली.
तळेगाव दाभाडे येथील आधी दोन मुली असलेल्या ३३ वर्षीय महिलेचा महाड येथे बेकायदा गर्भपात करण्यात आला होता. हा प्रकार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ससून रुग्णालयात उघड झाला होता. त्याबाबत पुरंदरे यांनी तक्रार दाखल केली होती. यावर आयोगातर्फे सुनावणी झाली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. पुरंदरे म्हणाले, ‘‘या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व पोलिस ठाणे आणि प्रभारी अधिकाऱ्यांना गर्भलिंग निदान प्रतिबंध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे अहवालात नमूद केले आहे.’’