
प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापरासाठी पुणे महापालिकेतर्फे ॲप
पुणे, ता. २९ ः बांधकाम प्रकल्पांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (एसटीपी) शुद्ध केलेले पाणी वापरणे यापुर्वीच बंधनकारक केले आहे. तर आता बांधकाम प्रकल्पांना हे पाणी घेण्यासाठी महापालिकेने खास ॲप विकसित केले असून त्यामुळे प्रकल्पांना पाणी वेळेत मिळणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
महापालिकेकडून शहरातील बांधकाम प्रकल्पांसाठी ‘एसटीपी’मधील पाणी वापरणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने शहरातील बांधकाम व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून त्यास प्रतिसाद मिळाला असून शुद्ध केलेले पाणी वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, शुद्ध केलेले पाणी बांधकाम प्रकल्पांना वेळेत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने pmcstpwatertanker हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर विकसकांनी त्यांच्या बांधकाम प्रकल्पांची नावे टाकून नोंदणी करायची आहे. त्यानंतर हे पाणी पुरवठा करण्यासाठी नोंदणी केलेल्या टॅंकरद्वारे पुरविले जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, विद्युत विभागाचे अभियंता श्रीनिवास कंदुल, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते.
काँक्रिटीकरणासाठीही ‘एसटीपी’चे पाणी
शहरात बांधकाम प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी पिण्याचे पाणी, बोअरवेल, विहीरींमधील पाण्याचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्याऐवजी ‘एसटीपी’तून शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर करणे बंधनकारक केले आहे. या पाण्याचा वापर न करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल. तसेच महापालिकेकडून सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठीही याच पाण्याचा वापर करावा, असेही महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.