Buying Old Flat : जुनी सदनिका विकत घेताय? सावधान... वीजबिल थकबाकी तपासा pune Buying Old Flat alert electricity bill checking arrears recovery | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity-Bill
जुनी सदनिका विकत घेताय? सावधान...वीजबिल थकबाकी तपासा

Buying Old Flat : जुनी सदनिका विकत घेताय? सावधान... वीजबिल थकबाकी तपासा

पुणे - तुम्ही जुनी सदनिका घेत असाल... तर ती घेताना पूर्वीच्या मालकाने वीजबिल भरले आहे का, याची माहिती घ्या. अथवा सदनिकेचे मीटर काढून नेले असल्याने, आपण नवीन मीटर घेऊ म्हणजे मागील थकबाकीची रक्कम भरावी लागणार नाही, असा गैरसमज ठेवू नका. कारण आता नवीन मीटर घेतले, तरी मागील थकबाकी तुमच्याकडून वसूल केली जाणार आहे.

तसेच, शहरात तुमच्या मालकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी दोन सदनिका असतील, आणि एका सदनिकेचे वीजबिल थकले, म्हणून ती सोडून दुसऱ्या ठिकाणच्या सदनिकेत जाऊन राहिलो म्हणजे थकबाकी भरणे टळेल, असा समजही करून घेऊन नका. कारण आता कोणत्याही कारणास्तव तुम्हाला वीजबिलाची थकबाकी चुकविता येणार नाही.

न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यानुसार, एखाद्या जागेच्या पूर्वीच्या मालकाने थकवलेले वीजबिल नंतरच्या मालकाकडून वसूल करण्याच्या सूचना ‘महावितरण’ने आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याचे महावितरणच्या पुणे परिमंडळातर्फे सांगण्यात आले.

यापूर्वी ठाणे परिमंडळाकडून वसुली

वीज कायद्यात ही तरतूद होती. परंतु तिचा फारसा वापर केला जात नव्हता, आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे याची अंमलबजावणी पुणे परिमंडळात लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी ठाणे परिमंडळात अशाप्रकारे कारवाई करून वीजबिलाच्या थकबाकीची वसुली करण्यात आली आहे.

पुणे परिमंडळाची कारवाई दृष्टिक्षेपात...

२ लाख ६६ हजार

वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक

४१७ कोटी ५२ लाख रुपये

या ग्राहकांकडे असलेली थकबाकी

कंपन्यांचे नुकसान टळणार

एखाद्या जागेचे वीजबिल थकीत असेल आणि जागेचा विक्री व्यवहार झाला असेल, तर नवीन मालक वीजजोडणीसाठी नव्याने अर्ज करतात. त्यामुळे त्या जागेवरील पूर्वीच्या बिलाची थकबाकी प्रलंबित राहून वीजवितरण कंपन्यांचे नुकसान होते. त्यामुळे जागेच्या वीजबिलाची थकबाकी वसूल केल्याशिवाय नवीन वीजजोडणी देण्यास नकार देण्याचे अधिकार वीजवितरण कंपन्यांना आहेत.

त्या विरोधात वीजबिलाची थकबाकी असलेली जागा खरेदी केलेल्या नव्या मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. महाराष्ट्रासह काही राज्यांतून अशा प्रकारची १९ प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायालयाने निकाल देताना, जागेची मालकी बदलली, तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार वीजकंपन्यांना असल्याचे स्पष्ट केले आहे.