Pune Corona Update : पुणे शहरात उरले अवघे 18 कोरोनाबाधित रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
पुण्यात उरले अवघे १८ कोरोना रुग्ण

Pune Corona Update : पुणे शहरात उरले अवघे 18 कोरोनाबाधित रुग्ण

पुणे : सुमारे तीन वर्षांपूर्वी हाहाकार माजविणारा कोरोना संसर्ग आता पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे. सध्या शहरात केवळ १८ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. यापैकी केवळ चार रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

याउलट पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व नगरपालिका, कॅंटोन्मेंट बोर्ड आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.३०) शून्य झाली आहे. यामुळे जिल्ह्याचा संपूर्ण ग्रामीण भाग हा आता कोरोनामुक्त झाला आहे.

सध्या शहर व जिल्ह्यात मिळून एकूण केवळ ३६ सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. यापैकी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी अठरा रुग्णांचा समावेश आहे. या दोन्ही शहरांत मिळून एकूण ३६ रुग्णांपैकी फक्त सहा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

या सहा रुग्णांमध्ये पुणे शहरातील चार आणि पिंपरी चिंचवडमधील दोन रुग्ण आहेत. उपचार घेणारे सहा रुग्ण वगळता उर्वरित ३० रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहरातील १४ आणि पिंपरी चिंचवडमधील १६ रुग्ण आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच दोन वर्षभरापूर्वी कोरोना उपचारास बेड मिळण्यासाठी पुणेकरांना वणवण फिरावे लागत असे. त्याच पुण्यात आता रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणारे अवघे चार कोरोना रुग्ण उरले आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दररोज रात्री पुणे शहर व जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्ण, उपचार घेत असलेले रुग्ण, विलगीकरणातील रुग्ण, उपचारानंतर बरे झालेले रुग्ण आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात फक्त १० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील सात आणि पिंपरी चिंचवडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात आढळून आलेल्या या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची ही अवघी ३६ इतकी असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
‘कोरोना’ची आतापर्यंतची स्थिती
- शहरातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला --- ९ मार्च २०२०
- कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू --- ३१ मार्च २०२०
- आतापर्यंत आढळून आलेले एकूण रुग्ण --- ६ लाख ९४ हजार २२९
- कोरोनातून बरे झालेले रुग्ण --- ६ लाख ८४ हजार ८४८
- कोरोनाने झालेले एकूण मृत्यू --- ९ हजार ४२३
- कोरोना चाचणी केलेले नागरिक --- ४८ लाख ९६ हजार ९०६

टॅग्स :Coronavirus