सर्वेक्षणावर राज्यभरात चर्चा

सर्वेक्षणावर राज्यभरात चर्चा

पुणे, ता. ३० : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहाने केलेले मतदारांचे महाराष्ट्रव्यापी सर्वेक्षण मंगळवारी राज्यात आणि समाजमाध्यमांद्वारे देशाच्या अनेक भागांत चर्चेचा विषय ठरले. महाराष्ट्रातील मतदारांनी सर्वेक्षणातून मोदी सरकारला आरसा दाखवला आहे आणि त्यातून महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारलाही पुढील दिशा दाखवली आहे, असा चर्चेचा सूर आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ‘सकाळ’च्या सर्वेक्षणाचा संदर्भ घेऊन ट्विट करताना ‘महाराष्ट्र भाजपला वेक-अप कॉल’ असे भाष्य केले. या ट्विटवर शेकड्याने प्रतिसाद आहे. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा बळकट आहे; तथापि महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्रित निवडणूक लढविल्यास भाजपला फटका बसू शकतो, असा सर्वेक्षणाचा कौल आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष म्हणून सर्वेक्षणात भाजप पुढे आला आहे. त्याचा संदर्भ घेत भाजप समर्थकांनी हे पाठबळ आणखी वाढेल, अशी अपेक्षा मांडली आहे.

महागाई, बेरोजगारी आणि इंधन दरवाढ ही मोदी सरकार आणि राज्य सरकारसमोरची सर्वांत मोठी आव्हाने असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. राजकारणाच्या बरोबरीने समाजमाध्यमांमध्ये या आव्हानांवर चर्चा सुरू आहे. या तीन आव्हानांना सरकार कशा पद्धतीने तोंड देते, याची उत्सुकता मतदारांमध्ये असल्याचे दिवसभरातल्या प्रतिसादावरून दिसते आहे.

‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेले सर्वेक्षण हा मुंबईत राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये चर्चेचा विषय होता. आपापल्या पक्षांना मतदारांचा कल कसा आहे, याचे कुतूहल राजकीय कार्यकर्त्यांमध्ये होते. हीच परिस्थिती पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, सोलापूर अशा शहरांमध्ये होती. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना सर्वेक्षणाच्या तपशीलात आणि आपापल्या मतदारसंघांतील परिस्थिती जाणून घेण्यात अधिक रस होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com