नाट्यगृहांच्या सुधारणेचा ‘प्रयोग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्यगृहांच्या सुधारणेचा ‘प्रयोग’
नाट्यगृहांच्या सुधारणेचा ‘प्रयोग’

नाट्यगृहांच्या सुधारणेचा ‘प्रयोग’

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा गौरव केला जात असताना शहरातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेमुळे या लौकिकास गालबोट लागत आहे. बंद पडलेले एसी, तुटलेल्या खुर्च्या, स्वच्छतागृहांची दुरवस्था, डासांच्या उच्छादामुळे कलाकारांसह नाट्यरसिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत झालेल्या तक्रारी आणि ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर
महापालिका प्रशासनाने बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, गणेश कला क्रीडा मंच या नाट्यगृहांच्या सुधारणेसाठी प्रत्येकी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून स्थापत्य आणि तांत्रिक सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे.

पुण्यात नाटक, संगीत मैफील, राजकीय कार्यक्रम, लावणीसह इतर कार्यक्रमांसाठी आयोजकांची प्रथम पसंती ही बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाही अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, गणेश कला क्रीडा मंच यास प्राधान्य दिले जाते. त्याचे बुकिंग मिळावे, यासाठी आधी तीन-तीन महिने कार्यवाही सुरू असते. पुणेकरांनादेखील हे नाट्यगृह सोईचे असल्याने तेथील कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो. एकीकडे ‘हाऊसफुल’ असे फलक लावले जात असताना प्रत्यक्ष नाटक किंवा अन्य कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कलाकार, प्रमुख पाहुणे, रसिकांना नाट्यगृहातील असुविधांचा वाईट अनुभव येत आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात सर्वाधिक प्रश्न
या सर्व नाट्यगृहांमध्ये सर्वाधिक पसंतीचे बालगंधर्व रंगमंदिर आहे. पण तेथे मैलापाण्याची दुर्गंधी, डास, बंद एसी, अपुरे पार्किंग, बंद पडलेले कॅन्टीन, व्हीआयपी रूम आणि मेकअप रूम स्वच्छ नसणे अशा अनेक समस्या आहेत. या नाट्यगृहातील सांडपाणी वाहिनी वारंवार तुंबत आहे. मात्र त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याऐवजी केवळ ठेकेदाराला लेखी, तोंडी समज देऊन तात्पुरते काम करून घेतले जात आहे. त्यामुळेच नाट्यगृहात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कार्यक्रमाचा आनंद घेण्याऐवजी डास मारत बसण्याची नामुष्की रसिकांवर येत आहे. बालगंधर्वमध्ये पाण्याचा प्रश्‍न असल्याने एसी चालत नाही. स्वच्छतागृहांना पुरसे पाणी मिळत नाही. असे अनेक प्रश्न यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातही कायम आहेत.

‘सकाळ’ने वेधले होते लक्ष
‘सकाळ’ने नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे नाट्य महोत्सव आयोजित केला होता. त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र त्या वेळी तेथील असुविधाही प्रकर्षाने जाणवल्या. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही याची माहिती देण्यात आली होती. त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी लक्ष घातले जाईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार उद्या (ता. १) नाट्यगृहाच्या समस्येवर बैठक होत आहे.


बालगंधर्व, अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि गणेश कला क्रीडामंच ही चार महत्त्वाची नाट्यगृहे असल्याने तेथील सांडपाणी व्यवस्था, स्वच्छतागृह, वीज, एसी, पार्किंग, स्वच्छता, पाणी पुरवठा यासह सर्व समस्या सोडविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व ठिकाणच्या समस्यांची पाहणी केली आहे. पुढील दोन महिन्यांत ही नाट्यगृहे स्वच्छ व सुंदर दिसतील.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

नाट्यगृहाच्या देखभालीसाठी स्वतंत्रपणे निधी देण्याचा निर्णय उत्तम आहे. त्याचा योग्य रितीने विनियोग व्हावा, ही अपेक्षा आहे. तसेच प्रेक्षकांच्या तक्रारींचा विचार करण्यासह कलाकारांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात आणि त्या सोडवण्यासाठीदेखील प्रयत्न व्हावेत.
- डॉ. गिरीश ओक, ज्येष्ठ अभिनेते

महापालिकेला उशिरा का होईना, जाग आली हे चांगले आहे. या निधीतून होणाऱ्या कामांमध्ये सातत्य हवे. अन्यथा चार दिवस कामे होतील आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होईल.
- सुरेखा देशमुख, प्रेक्षक

नाट्यगृहांसाठी अर्थसंकल्पातील निधीची तरतूद
- सर्व नाट्यगृहांच्या नव्या व उर्वरित कामांसाठी - २२.६५ कोटी
- बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण निधी - १ कोटी
- अर्धवट नाट्यगृह व कलादालनाची कामे पूर्ण करणे - १ कोटी
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह विस्तारीकरण - १ कोटी
- चार नाट्यगृहांच्या विद्युतविषयक कामांसाठी निधी -१ कोटी