‘राज्यातील सर्व देवस्थाने सनदधारक 
गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्यावीत’


राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची मागणी

‘राज्यातील सर्व देवस्थाने सनदधारक गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्यावीत’ राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची मागणी

पुणे, ता. ३१ ः ‘मंदिरांचे व्यवस्थापन करणे, हे राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तींचे काम नाही. त्यामुळे देवस्थानच्या विश्वस्त निवडीबाबत राज्य शासनाने किंवा कुठल्याच राजकीय पक्षाने हस्तक्षेप करू नये. सर्व मंदिरे शेकडो वर्षांपासून मंदिर व्यवस्थापनात तज्ज्ञ असणाऱ्या गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्यावीत,’ अशी मागणी ‘राष्ट्रीय गुरव समाज महासंघा’ने केली आहे.

देवस्थाने सनदधारक गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी मुंबई पब्लिक ट्रस्ट कायदा आणि इतर नियमांमध्ये ताबडतोब सुधारणा करावी, अन्यथा समस्त गुरव समाज तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महासंघाचे राष्ट्रीय संघटक डॉ. नितीन ढेपे यांनी बुधवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत दिला. यावेळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव, अनंत पाटील आणि कार्यकरणी सदस्य गुंडेराव पावशेरे यावेळी उपस्थित होते.

राज्यामध्ये हजारो देवस्थाने असून गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांची व्यवस्था वेगवेगळ्या राजव्यवस्थेमध्ये गुरव, जंगम, ब्राह्मण आणि इतर सेवेकरांच्या माध्यमातून केली जात आहे. अशा सेवेकऱ्यांचे पूजाअर्चा करण्याचे आणि मंदिर व्यवस्थापनाचे हक्क हे वंशपरंपरागत आणि अहस्तांतरणीय असतात. मात्र, सध्या गुरव समाजाचे हक्क डावलण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. ढेपे यांनी दिली.

जेजुरीच्या विश्‍वस्त निवडीबाबत आक्षेप
जेजुरी मंदिर येथील पूजेचे अधिकार शेकडो वर्षांपासून गुरव समाजाकडे आहेत. तशा आशयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासूनच्या सनदा आणि राजमाता जिजाऊंच्या वतीने केलेल्या निवाड्याचा ताम्रपट गुरव समाजाच्या नावाने आहे. असे असताना गेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये जेजुरी मंदिर ट्रस्टमध्ये गुरव समाजाचा समावेश नाही. मंदिर समितीवर स्थानिक लोकांची नेमणूक नक्कीच व्हावी, पण ती गुरव समाजातूनच व्हावी आणि किमान पन्नास टक्के विश्वस्त हे सनदधारी गुरव समाजातून निवडले जावेत. त्यामुळे या निवडीबाबत आक्षेप असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com