
डॉ. राणा, पवार यांना पुरस्कार जाहीर
पुणे, ता. ३१ ः शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशनाच्या वर्धापनानिमित्त शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक डॅा. अशोक राणा यांना, तर महाराणी ताराराणी पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार यांना जाहीर झाला आहे.
डॉ. राणा यांनी सामाजिक चळवळीत योगदान देऊन अंधश्रद्धा, इतिहास व अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण चिकित्सा करून ७० पुस्तकांचे लिखाण केले आहे. देशभर त्यांची मूर्ती अभ्यासक म्हणून ख्याती आहे. तसेच पवार या गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, शेतीविषयक, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत. त्याबरोबरच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या फायदा व्हावा, यासाठी त्या पुण्यात १६ वर्षांपासून भीमथडी जत्रा भरवतात. शनिवारी (ता. ३ जून) सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा शिवपुत्र महोत्सव होणार आहे. त्या पुरस्कारांचे वितरण होईल. तसेच शिवस्पर्श प्रकाशनाचे ॲड. शैलजा मोळक लिखित शिवपुत्र शंभूराजे, डॅा. मनीषा वारे लिखित प्रजाहितदक्ष राज्यकर्ती : अहिल्याबाई होळकर व डॅा. लीना निकम लिखित बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ आणि डॉ. अशोक राणा लिखित असत्याची सत्यकथा व सणांची सत्यकथा या पुस्तिकांचे प्रकाशन होणार आहे. शिवस्पर्श शैक्षणिक दत्तक योजनेतील १० गरजू हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप होणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर मोळक व विश्वस्त प्रवीण गायकवाड आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सचिव प्रज्ञेश मोळक यांनी केले.