
चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञानाचा वापर वाढणार ः खुराना
पुणे, ता. २ ः सध्या भारतीय चित्रपटसृष्टी वेगाने बदलत आहे. त्यात वापरले जाणारे व्हीएफएक्स, ॲनिमेशनमुळे आपले चित्रपट जागतिक पातळीवरील प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. आगामी काळात या तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात विकसित होतील. सरकारनेदेखील अशा चित्रपटांना अनुदान देण्याची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक आकाश खुराना यांनी केले. पुणे येथील कॅम्प भागातील डिझाइन स्कूल अकादमीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अकादमीचे संस्थापक सतीश नारायण व संचालिका श्रीदेवी सतीश आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते. खुराना यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचा ४० वर्षांचा प्रवास सांगितला. नारायण म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक्स (एव्हीजीसी) उद्योगाला चालना देण्यासाठी ३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.’’