
Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आता हेल्मेट आवश्यक
पुणे : तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जात असाल किंवा आता जाणार असाल; तर मग जरा इकडे लक्ष द्या! तुम्ही विद्यापीठाच्या आवारात दुचाकीवरून प्रवेश करणार असाल, तर आता तुम्हाला हेल्मेट वापरावे लागणार आहे. विद्यापीठाच्या आवारात येताना-जाताना दुचाकीचालकासाठी हेल्मेट घालावे, अशी स्पष्ट सूचना विद्यापीठाने केली आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका यांसह सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय कार्यालयात दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. हेल्मेट घातले नसल्यास मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदींनुसार संबंधित शिक्षेस पात्र राहतील.
तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १२९ चे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल, असा स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यापीठाशी संबंधित सर्व अधिकारी,
कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांनी विद्यापीठ आवारात दुचाकीवरून ये-जा करताना हेल्मेट परिधान करावे, अशी सूचना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. विद्यापीठ आवारात दुचाकी वापरताना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधित मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार शिक्षेस पात्र राहिल, असेही परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही हेल्मेट वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ आवारात दुचाकी वापरताना हेल्मेट घालण्याची सूचना करण्यात आली आहे.
- डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ